अरेरे! बाप्पाचे विसर्जन करायला गेले आणि ६ जण स्वतःच बुडाले!

बाप्पाचे विसर्जन करायला वाहत्या पाण्यात उतरलेल्या मुंबईतील ३ तर पिंपरी-चिंचवड येथील २ आणि अमरावतीत १, असे ६ जण पाण्यात बुडाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

राज्यात यंदा गणेशोत्सवावर कोरोनामुळे बरीच बंधने घातली, त्यामुळे उत्सव तसा शांततेत पार पडला, मात्र तरीही अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्सवाला लागबोट लागलेच. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईसह पुण्यात गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला, परंतु हाच उत्साह त्यांच्या जीवासाठी धोक्याचा ठरला. बाप्पाचे विसर्जन करायला वाहत्या पाण्यात उतरलेले मुंबईतील ३ तर पिंपरी-चिंचवड येथील २ आणि अमरावतीत १ असे एकूण ६ जण दुर्दैवाने पाण्यात बुडाले.

वर्सोवा समुद्रात ५ जणांना जलसमाधी!

मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरलेली ५ मुले बुडाली. त्यातील दोन मुलांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले, परंतु उर्वरित तीन मुले अजून बेपत्ता आहेत. स्थानिक पोलिस, पालिका, अग्निशमक दल आणि तटरक्षक दलाच्या माध्यमातून या बेपत्ता मुलांचा शोध सुरु होता. तसेच नौदलाचीही मदत घेण्यात आली. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे मुलांचा शोध घेण्यात अडथळा येत होता. सोमवारी सकाळपर्यंत या बेपत्ता मुले सापडल्याचा वृत्त नव्हते.

(हेही वाचा : सोमय्यांना केले स्थानबद्ध? फडणवीसांसह भाजपा नेत्यांनी केला सरकारचा निषेध)

पुण्यातही इंद्रायणीत २ जण, अमरावतीत एकाचा मृत्यू! 

पुणे जिल्ह्यातही गणपती विसर्जनादरम्यान दोन मुले बुडाली. मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणपतींचे विसर्जन सुरू असताना दोन मुले बुडाल्याची घटना घडली. दत्ता ठोंबरे (२०) आणि प्रज्वल काळे (१८) अशी या मुलांची नावे आहेत. प्रज्वल काळे हा ठोंबरे यांचा नातेवाईक होता. गणपतीनिमित्त तो पुण्यात आला होता. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. बुडालेल्या मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील १७ वर्षीय अरमान पठाण या मुलाचा बासलापूर तलावात बुडून मृत्यू झाला. पोहताना गाळात पाय फसल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण, गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवले. मात्र अरमानच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here