कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाल्यामुळे आता टप्प्याटप्प्याने या मार्गावर धावणा-या गाड्या विजेवर चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह सध्या सहा मार्गांवरील गाड्या या विजेवर धावणार आहेत. 8 नोव्हेंबरपासून या नव्या सुविधेला सुरुवात झाली आहे. कोकणात जाणा-या चाकरमान्यांची लाडकी असलेली सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसही आता विजेवर धावणार आहे.
या गाड्या विजेवर धावणार
कोकण रेल्वे मार्गावरुन धावणारी मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन ही जनशताब्दी एक्सप्रेस 9 नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. त्याचप्रमाणे कोचुवेली ते इंदूर ही साप्ताहिक एक्सप्रेस 11 नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. तसेच इंदूर ते कोचुवेली ही साप्ताहिक एकस्प्रेस 8 नोव्हेंबर, भावनगर ते कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस 15 नोव्हेंबर,कोचुवेली ते भावनगर साप्ताहिक गाडी 17 नोव्हेंबर पासून विजेवर धावण्यास सुरुवात होणार आहे.
(हेही वाचाः मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा झाला खोळंबा)
विद्युतीकरणाचे काम पूर्ण
कोकण रेल्वे मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता कोकण रेल्वेचा वेग अधिक वाढणार आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्या या टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह विजेवर चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 8 नोव्हेंबरपासून सहा मार्गांवरील गाड्या विजेवर धावणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. कोकण रेल्वेचे उपमहाप्रबंधक व जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community