कांदिवलीत Skill Development Training Center; येत्या तीन वर्षांत दहा हजार युवक युवतींना मिळणार प्रशिक्षण

1043
कांदिवलीत Skill Development Training Center; येत्या तीन वर्षांत दहा हजार युवक युवतींना मिळणार प्रशिक्षण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेने कांदिवली (पूर्व) येथे उभारलेले कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र (Skill Development Training Center) मुंबईसह राज्यभरातील युवक-युवतींना रोजगाराच्या असंख्य वाटा खुल्या करू देणारे दीपस्तंभ ठरणार आहे. विविध व्यावसायिक कंपन्यांच्या सहयोगाने या प्रशिक्षण केंद्रातून येत्या तीन वर्षांत दहा हजार युवक-युवतींना आणि त्यापुढेही सातत्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्यक्त केला. कांदिवली (पूर्व) येथे महानगरपालिकेने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. या केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी तसेच विविध व्यावसायिक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल शुक्रवारी (२३ ऑगस्ट २०२४) आले होते. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

केंद्रीय कौशल्य, उद्यम विकास मंत्री जयंत चौधरी; कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुनील राणे, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त (आर उत्तर) नयनीश वेंगुर्लेकर यांच्यासह सीआयआय, नॅस्कॉन अशा विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Maharashtra Bandh : महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस)

केंद्र शासनाच्या योजनांचाही मिळणार लाभ

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, आकुर्ली येथील प्रशिक्षण केंद्राप्रमाणेच बोरिवलीतही प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. तसेच लवकरच वसतिगृह देखील उभारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून केंद्र शासन, राज्य शासनाच्या योजनांचा लाभ युवक-युवतींना मिळणार आहे. या प्रशिक्षणानंतर लवकरात लवकर रोजगारही मिळणार आहे. तसेच देशभरात नावाजलेल्या कंपन्या या केंद्राद्वारे युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण (Skill Development Training Center) देणार आहेत. त्यानंतर या युवकांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधीही उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी म्हणाले, तरुणांच्या हातात आपला देश आहे. त्यामुळे आपल्या देशातील तरुण-तरुणींना अधिकाधिक प्रमाणात तंत्रकुशल शिक्षण दिल्यास ते स्वत:च्या पायावर उभे राहतील. अशा केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना राज्य शासनाच्या योजनांसह केंद्र शासनाच्या योजनांचाही लाभ मिळणार आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कांदिवली (पूर्व) येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राबाबत माहिती दिली. या केंद्रात युवक-युवतींना हॉटेल मॅनेजमेंट, विक्री आणि व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता अशा विविध क्षेत्रांबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जांभेकर यांनी दिली. विविध व्यावसायिक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. मुंबई महानगरपालिकेसोबत या कंपन्या युवक-युवतींना कोणकोणत्या क्षेत्राबाबतचे प्रशिक्षण देणार याबाबतची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. (Skill Development Training Center)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.