पंढरपुरात (Pandharpur) आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या वाऱ्या भरतात. त्या वेळी लाखो वारकरी आणि भाविक येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात; त्यांना दर्शन मंडप रांगेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केलेल्या १२९ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्याच्या आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शासनाच्या शिखर समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.
(हेही वाचा- Mumbai Metro 3 : बीकेसी-आरे प्रवास आता सोपा; मेट्रो ३ चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार)
कसा असेल प्रस्तावित दर्शन मंडप ?
प्रस्तावित दर्शन मंडपामध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, उद्वहन (लिफ्ट), वैद्यकीय सुविधा, अल्पोपहार, आपत्कालीन मार्ग, प्रसाद, सुरक्षा व्यवस्था आणि हिरकणी कक्ष, दिव्यांग सुविधा, अत्यावश्यक वाहन व्यवस्था आदी सुविधा समाविष्ट आहेत. स्काय वॉकमुळे स्थानिक नागरिकांना दर्शन रांगेचा कोणताही त्रास होणार नाही. भाविकांना दर्शनाचा कालावधी कमी करणे शक्य होणार आहे. भाविकांना अन्नछत्राच्या माध्यमातून विनामूल्य जेवणाची सुविधा पुरवली जाणार आहे. (Pandharpur)
दर्शन मंडपात भाविकांची होते गैरसोय
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी आणि चैत्री वारी होते. त्यावेळी लाखो वारकरी आणि भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात. वारी काळात विठ्ठल दर्शनासाठी २४ ते ३० तासांचा अवधी लागत असताना भाविकांना बसण्यासाठी सुविधा नाही. आपत्कालीन व्यवस्थेसह वैद्यकीय सुविधा पुरविण्यास अडथळा येतो. शौचालय सुविधा मिळत नाही. दर्शन रांगेत सुधारणा होण्याच्या दृष्टीने यापूर्वी २०१८ साली विठ्ठल मंदिर समितीने दर्शन हॉल बांधकाम आणि स्काय वॉक उभारण्याचा ठराव मंजूर केला होता; परंतु त्यावर पुढे काही हालचाली झाल्या नव्हत्या. आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आठ दिवसात निघेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली आहे. (Pandharpur)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community