मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलातील 14 वर्षांपासून वसलेल्या झोपडट्ट्या लवकरच हटवल्या जातील, अशी माहिती कुलगुरु प्राध्यापक सुहास पेडणेकर यांनी मंगळवारी सिनेटमध्ये दिली. झोपड्या हटवण्यासाठी कुलसचिव प्राध्यापक सुधीर पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे, यात विद्यापीठाचे अभियंता असतील अशी माहिती कुलगुरुंकडून देण्यात आली.
सदस्यांनी व्यक्त केली भीती
सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या मागे 14 वर्षांपासून वसलेल्या झोपड्यांचा विषय सिनेटमध्ये उपस्थित केला होता. विद्यापीठातील विविध कामांसाठी कंत्राटदारांनी इथे कामगारांना आणले होते. त्यांपैकी इथे राहणाऱ्या अनेक नागरिकांची मुले जन्माला आली. ती आता रहिवासी होण्याच्या मार्गावर असून, त्यांच्या जन्मदाखल्यावर इथले पत्ते आहेत. त्यामुळे एक दिवस कालिना संकुल झोपड्यांमुळे ‘एसआरए कालिना सोसायटी’ होईल, अशी भीती व्यक्त करीत थोरात यांनी त्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल केला होता.
( हेही वाचा: मुंबईला धोक्याची घंटा.. या असुरक्षित प्रभागांमध्ये तुम्ही तर येत नाहीत ना? )
दोन महिन्यांत झोपड्या हटवणार
आम्ही वेळोवेळी विद्यापीठात झालेल्या झोपड्यांच्या अतिक्रमणाचा विषय लक्षात आणून देतो; मात्र त्यावर कारवाई केली जात नाही. हे गंभीर आहे, असा मुद्दा सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी मांडला. त्यावर कंत्राटदारांचे काम पूर्ण झाल्यावर या झोपड्या लवकरात लवकर हटवल्या जातील, असे आश्वासन कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी दिले, पण यावर सदस्यांचे समाधान न झाल्याने कुलगुरुंनी दोन महिन्यांत झोपड्या हटवण्याचे आश्वासन दिले.
Join Our WhatsApp Community