महापालिकेच्या रडावर आता झोपडपट्ट्या आणि चाळी!

झोपडपट्टीत सध्या जरी रुग्ण संख्या अधिक नसली, तरीही जर कोरोना झोपडपट्टीत पसरला, तर मुंबईतील सीसीसी वन आणि सीसीसी टूसह कोविड केअर सेंटरही कमी पडतील, अशी भीती महापालिकेला वाटत आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यातील सर्वाधिक रुग्ण हे इमारती व टॉवरमध्ये राहणारे आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असली तरी बहुतांशी रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत असल्याने त्याचा ताण महापालिकेच्या यंत्रणावर येत नाही. परंतु महापालिकेसमोर आव्हान आहे ते झोपडपट्टी व चाळींमधील रहिवाशांचे. त्यामुळे झोपडपट्ट्या महापालिकेच्या रडावर असून इथे एक जरी रुग्ण आढळून आल्यास त्याला आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात येत आहे. कारण झोपडपट्टीत सध्या जरी रुग्ण संख्या अधिक नसली, तरीही जर तो झोपडपट्टीत पसरला, तर मुंबईतील सीसीसी वन आणि सीसीसी टूसह कोविड केअर सेंटरही कमी पडतील, अशी भीती महापालिकेला वाटत आहे.

सध्या बेडची व्यवस्था राखताना काही प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या निर्देशानुसार ज्या रुग्णांना खरोखरच दाखल करण्याची गरज आहे, त्यांनाच दाखल करून घ्यावे, यासाठी रुग्णालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच अजून तरी बोरीवली भागात झोपडपट्टी व चाळींमध्ये तसे रुग्ण आढळून येत नाही. तरीही आमचे जास्त लक्ष या भागांवरच आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण आढळून आल्यास प्राधान्याने त्याला बाहेर काढून आसपासच्या लोकांना क्वारंटाईन करण्यावर भर दिला जातो.
– भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त, आर मध्य विभाग

कोविड रुग्णालयांसह कोविड केअर सेंटरमधील रुग्ण खाटा रिकाम्या

मुंबईत मार्च महिन्यापासून रुग्णांची संख्या एवढी झपाट्याने वाढू लागली की, दरदिवशी सरासरी नऊ ते साडे नऊ हजार रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी संपूर्ण मुंबईत ९,२०० रुग्ण आढळून आले असून शुक्रवारपर्यंत एकूण ९० हजार ३३३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आजवर सक्रीय रुग्णांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढूनही महापालिकेची खासगी रुग्णालये सोडली तरी महापालिकेच्या कोविड रुग्णालयांसह कोविड केअर सेंटरमधील रुग्ण खाटा रिकाम्या आहेत.

आता ए विभागामध्ये जे रुग्ण आढळून आले आहेत, ते इमारतीतीलच आहे. त्यामुळे ते रुग्ण घरीच उपचार घेत असल्यामुळे तसेच स्वत:च खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याने तेवढा परिणाम जाणवत नाही. परंतु आता त्या इमारतीतील घरकाम करणारे नोकर बाधित आढळून येवू लागले आहेत. त्यामुळे झोपडट्टीकडे अधिक लक्ष असून त्यासाठी सीसीसी वनची नियोजन करण्यात आले आहे.
– चंदा जाधव, सहायक आयुक्त ए विभाग

श्रीमंत वस्तीतील संसर्गाचा महापालिकेवर ताण नाही!

सध्या आढळून येणारे सर्वाधिक रुग्ण हे इमारती, टॉवरमध्ये राहणारे आहेत. त्यामुळे जे रुग्ण कोविडबाधित म्हणून आढळून आले आहेत, ते रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. अजून तरी या विषाणूचा संसर्ग श्रीमंत वस्तीत असल्यामुळे याचा ताण महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर पडत नसला तरी महापालिकेला भीती आहे ती झोपडपट्टी आणि चाळींमधील रहिवाशांची. या विषाणूपासून पसरणाऱ्या आजाराचा ज्याप्रकारे प्रार्दुभाव होतो, ते पाहता झोपडपट्टी व चाळींसारख्या दाटीवाटीने पसरणाऱ्या वस्त्यांमध्ये पसरल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे झोपडपट्टी व चाळीमध्ये एक जरी रुग्ण आढळून आला तरी पूर्वीच्या मार्गदर्शक धोरणानुसार त्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांना त्वरीत सीसीसी वन किंवा सीसीसी टू मध्ये दाखल करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेसाठी झोपडपट्टी व चाळी या मोठ्या आव्हान असल्याचे दिसून येत आहे.

सध्या तरी मालाड तसेच गोरेगाव भागातील झोपडपट्टी व चाळीमधील रुग्णांची संख्या कमी आहे. पण जो काही संसर्ग होतोय तो इमारतींमधील रहिवाशांमध्येच. त्यामुळे इमारतीतील लोकांना घरीच राहून उपचार घेता येत असले तरी झोपडपट्टी व चाळींमधील रहिवाशांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागत असल्याने त्यांना घरीच ठेवणे शक्य नाही. त्यामुळे झोपडपट्टयांवर बारीक लक्ष असून गोरेगाव व मालाडमध्ये दाटीवाटीच्या या वस्त्या मोठया प्रमाणात असल्याने तशा प्रकारची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
– संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त, पी उत्तर व पी दक्षिण विभाग

(हेही वाचा : काळजी नको ! संचारबंदी असली तरीही लसीकरण सुरूच राहणार!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here