२० रुपयांसाठी चिमुकले हात करत आहेत १ हजार स्ट्रीपची पॅकिंग!

पॅकिंग करणाऱ्यांच्या हातात रबरी हातमोजे नाहीत, चेहऱ्यावर मास्क नाही व सॅनिटायझरचा वापर केला जात नाही.

146

कोविड चाचण्यांसाठी लागणा-या स्वॅब टेस्ट स्ट्रीपच्या पॅकिंगचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्वॅब स्ट्रीप पॅकिंग करताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नसून, चिमुकले हात देखील या पॅकिंगसाठी वापरले जात असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

उल्हासनगर येथील घटना

उल्हासनगर कॅम्प-२ येथील खेमाणी परिसरातील हा व्हिडिओ असून, व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर उल्हासनगर महापालिका आणि पोलिस प्रशासनाला जाग आली आहे. त्यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. अन्न व औषध प्रशासन यांना याबाबत कळवण्यात आले असल्याची माहिती, उल्हासनगर महापालिकेचे प्रवक्ते युवराज भदाणे यांनी दिली आहे. तसेच बालमजूर कायद्याअंतर्गत पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचाः दादर केले साफ… मुजोर फेरीवाल्यांमध्ये ‘नव्या’ अधिकाऱ्याची दहशत)

कोरोनाला आमंत्रण

राज्यभरात कोरोनाने थैमान घातलेले असून, या आजारावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत मात्र कोरोनाला आमंत्रण दिले जात असल्याचा प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर-२ येथील खेमाणी परिसरात घराघरात कोविड चाचणीच्या स्वॅबसाठी लागणा-या स्ट्रीपची पॅकिंग कुठल्याही प्रकारची सुरक्षा न घेता करण्यात येत आहे.

कुठलीही सुविधा नाही

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्वॅब टेस्ट स्ट्रीपची पॅकिंग केली जात असून, पॅकिंग करताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. पॅकिंग करणाऱ्यांच्या हातात रबरी हातमोजे नाहीत, चेहऱ्यावर मास्क नाही व सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याचे व्हिडिओवरुन समोर आले आहे. या पॅकिंगसाठी लहान मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. १ हजार स्ट्रीपची पॅकिंग केल्यानंतर येथील मजुरांना २० रुपये मिळत आहेत, त्यामुळे घरातील लहान-मोठी मंडळी स्ट्रीप पॅकिंग करताना दिसून येत आहेत. पॅकिंगचे काम देणाऱ्या ठेकेदाराकडून या पॅकिंग करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा पुरवल्याचे दिसून येत नाही.

(हेही वाचाः मास्क लावण्यावरून महापालिकेचा गोंधळात गोंधळ!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.