मोठ्या नाल्याची सफाई ३५ टक्के, पण छोट्या नाल्यांच्या सफाईचा पत्ताच नाही!

मोठ्या नाल्यांच्या निविदा पूर्ण झाल्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सर्व प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून दिले. परंतु छोट्या नाल्यांचे प्रस्ताव उशिराने सादर केले आणि त्या प्रस्तावांना अद्यापही मंजुरी प्राप्त झालेली नाही.

70

मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम ३५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती देताना केला. परंतु ज्या छोट्या नाल्यांची सफाई होणे आवश्यक असते, त्या नाल्यांची सफाई अद्यापही सुरु झालेली नाही. या छोट्या नाल्यांचे प्रस्तावच मंजूर न झाल्याने तसेच उशिरा सादर केल्यामुळे अद्यापही कंत्राटदारांनी या कामाला हातच लावलेला नाही. त्यामुळे मोठ्या नाल्यांच्या सफाईकडे लक्ष वेधणाऱ्या प्रशासनाला छोट्या नाल्यांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छोट्या नाल्यांचे प्रस्ताव उशिराने सादर केले!

मुंबईमध्ये यापूर्वी मोठ्या नाल्यांची सफाई कंत्राटदारांकडून तर छोट्या नाल्यांची सफाई विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने केली जायची. परंतु मागील दोन वर्षांपासून स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांकडून छोट्या नाल्यांची सफाई न करता महापालिकेने या छोट्या नाल्यांच्या कामांसाठीही कंत्राटदारांची नेमणूक करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे २०१९-२० करता नेमलेल्या कंत्राटदारांकडूनच मागील वर्षी कोविड काळात सफाई करून घेतली. परंतु आर्थिक वर्षात होणारी या नालेसफाईचे काम कॅलेंडर वर्षात करण्यासाठी मागील नोव्हेंबर महिन्यातच निविदा मागवण्यात आले. त्यानुसार मोठ्या नाल्यांच्या निविदा पूर्ण झाल्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सर्व प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून दिले. परंतु छोट्या नाल्यांचे प्रस्ताव उशिराने सादर केले आणि त्या प्रस्तावांना अद्यापही मंजुरी प्राप्त झालेली नाही.

(हेही वाचा : कोरोना वाढतोय, महापालिकेचे चुकतंय कुठे?)

यंदा पावसाळ्यापूर्वीच एकूण नालसेफाईच्या ८० टक्के गाळ काढला जाणार!

अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी नालेसफाईचे काम ३५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करताच सत्ताधारी पक्षासह पहारेकरी असलेल्या भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनीही आपल्या विभागांमध्ये नालेसफाईच्या कामाला सुरुवातच झाली नसल्याच्या तक्रारी केल्या. मोठ्या नाल्यांची सफाई होत असली तरी मुंबई तुंबण्यास पहिले कारणीभूत ठरतात ते छोटे नाले, रस्त्यालगतच्या पेटीका नाले. परंतु याचीच सफाई झाली नाही तर मोठ्या नाल्यांच्या सफाईला अर्थच नाही, असा सूर नगरसेवकांनी आळवायला सुरुवात केली. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चुकीची माहिती देतात की काय असाही सवाल नगरसेवकांकडून केला जात आहे. यंदा पावसाळ्यापूर्वीच एकूण नालसेफाईच्या ८० टक्के गाळ काढला जाणार आहे, तर उर्वरीत २० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यालाच अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात छोट्या नाल्यांची सफाईचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.