वंदना बर्वे
या वर्षाच्या अखेपरपर्यंत देशातील मुसलमानांची संख्या १९ कोटी ७५ लाखांवर पोहचणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत सांगितले की, राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत भारताची लोकसंख्या १३८ कोटी ८२ लाखांवर पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
यात १४.२ टक्के संख्या मुसलमानांची आहे. यानुसार, २०२३ मध्ये देशातील मुसलमानांची संख्या १९ कोटी ७५ लाख होईल. आयोगाने हा रिपोर्ट लोकसंख्येची आकडेवारी तयार करणाऱ्या तांत्रिक गटाच्या जुलै २०२० मधील रिपोर्टच्या आधारावर तयार केली आहे. देशात मुसलमानांची लोकसंख्या किती? यात पसमांदा समाजाची संख्या किती? असा प्रश्न दक्षिण कोलकात्याच्या खासदार रॉय यांनी विचारला होता.
(हेही वाचा – पुरवणी मागण्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला झुकते माप)
स्मृती इराणी म्हणाल्या की, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने केलेल्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण २०२१-२२ नुसार, सात वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुस्लिमांचा साक्षरता दर ७७.७ टक्के आहे. श्रमशक्तीचा सहभाग दर ३५.१ टक्के आहे. ३१ मार्च २०१४ नंतर प्रथमच नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करणाऱ्या किंवा बांधणाऱ्या मुस्लिम कुटुंबांची टक्केवारी ५०.२ टक्के असल्याचे इराणी यांनी सांगितले. तर, मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षण २०२०-२१ नुसार, ९४.९ टक्के मुस्लिमांना पिण्याच्या पाण्याचे सुधारित स्त्रोत आणि ९७.२ टक्के मुस्लिमांना सुधारित शौचालये उपलब्ध आहेत, असेही इराणी यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.
गेल्या पाच वर्षांत २.७५ लाख मुले बेपत्ता
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत २.७५ लाख मुले बेपत्ता झाली आहेत. यात २.१२ लाख मुली आहेत. या कालावधीत २,४०,५०२ मुलांचा शोध घेण्यात आला. मंत्रालयाने “ट्रॅक चाइल्ड पोर्टल” विकसित केले आहे, जे हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांचा शोध घेण्यास उपयुक्त आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community