तौक्तेच्या प्रभावाने मुंबईत इतक्या झाडांची पडझड

पडलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी असल्याचे उद्यान विभागाचे म्हणणे आहे.

95

मुंबईत मागील दोन दिवसांत खासगी परिसरातील ५०४ व सार्वजनिक परिसरातील ३०८ यानुसार एकूण ८१२ झाडे पडली. यापैकी सुमारे ७० टक्के पडलेली झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर (Peltoforum), गुलमोहर, गुळभेंडी (Thespesia), रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) इत्यादी झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. त्यामुळे पडलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी असल्याचे उद्यान विभागाचे म्हणणे आहे.

८१२ झाडांची पडझड

मुंबई किनारपट्टी लगतच्या परिसरातून १६ व १७ मे २०२१ रोजी तौक्ते चक्रीवादळाने मार्गक्रमण केले. या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव मुंबईत दिसून आला. मुंबई महापालिका क्षेत्रात वा-याच्या वेगाने तब्बल ११४ किलोमीटर प्रती तास पेक्षा अधिक वेग गाठल्याचे दिसून आले. याच वेगवान वा-यांमुळे महापालिका क्षेत्रात ८१२ झाडे पडली. यापैकी, ५०४ झाडे ही खासगी क्षेत्रातील असून, ३०८ झाडे ही सार्वजनिक परिसरातील आहेत.

IMG 20210519 WA0020

(हेही वाचाः महापालिकेविरोधात सदोष ‘वृक्षवधाची’ याचिका दाखल करणार भाजप!)

अशी आहे आकडेवारी

पडलेल्या ८१२ झाडांमध्ये २४९ झाडे ही शहरातील, तर २५६ झाडे ही पूर्व उपनगरातील आहेत. उर्वरित ३०७ झाडे ही पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी ५४५ झाडे ही १६ व १७ मे २०२१ रोजी पडली. तर २६७ झाडे ही १८ मे २०२१ रोजी पडली आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील ८१२ झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे १ हजार ४५४ झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना देखील घडल्या. यापैकी ७९८ फांद्या या खासगी परिसरातील झाडांच्या, तर उर्वरित ६६६ फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या.

IMG 20210519 WA0021

निसर्ग वादळामुळेही सर्वाधिक विदेशी झाडांची पडझड

गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ३ जून ते ६ जून २०२० या कालावधीत मुंबईत ३२३ झाडे पडली होती. यापैकी खासगी परिसरातील २२१ व सार्वजनिक परिसरातील १०२ झाडे पडली. ५ व ६ ऑगस्ट २०२० या दोन दिवसांच्या कालावधीत देखील महापालिका क्षेत्रात वेगवान वा-यांमुळे ३५५ झाडे पडली. ज्यापैकी १७९ झाडे ही खासगी परिसरातील, तर १७६ झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. या पडलेल्या झाडांमध्ये देखील विदेशी झाडांचे प्रमाणे अधिक होते. या अनुषंगाने नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करुन स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्याबाबत धोरण ठरवण्याचा विचार करण्यात येईल. तसेच वृक्ष परिक्षणाची (ट्री ऑडिट) कार्यवाही देखील नियमितपणे करण्यात येईल, असेही उद्यान विभागाद्वारे कळवण्यात आले आहे.

IMG 20210519 WA0022

(हेही वाचाः तौक्ते चक्रीवादळाने राज्यात पाडले साडेपाच हजार विजेचे खांब)

स्थानिक प्रजातींचीच झाडे लावण्याची गरज

ही झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडली होती. ज्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता होती. परंतु, महापालिकेच्या उद्यान विभागाने अक्षरशः दिवसरात्र नियोजन व कार्यवाही करुन, ही पडलेली झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केले आहेत. मुंबईत वृक्षारोपण करताना प्राधान्याने स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे असल्याची बाब या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.