मृदा व जलसंधारण विभागाचे कर्मचारी आता दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत पहिली, तर दुसरी शिफ्ट दुपारी बारा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत असणार आहे. मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख लवकरचं या संबंधीचा निर्णय घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता कामाच्या वेळेचे नियोजन नव्याने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. केवळ शासकीय नाही, तर खाजगी कार्यालयाच्या वेळा देखील बदलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. सर्व कार्यालयांच्या वेळा या जवळपास सारख्याच असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग घराच्या बाहेर पडतो आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं.
खाजगी कार्यालयांनाही सूचना
मुंबईत लोकल ट्रेन मध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. म्हणून कामाच्या ज्या नियोजित वेळा आहेत त्यामध्ये बदल करणं गरजेचं असून, त्यानुसार पावलं उचलली जावीत अशा प्रकारचे आवाहन शासकीय तसेच खाजगी कार्यालयांना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर आता मृदा आणि जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात येणार आहे. मृदा व जलसंधारण विभागाकडून असा निर्णय घेतल्यानंतर इतरही विभागाकडून कार्यालयीन वेळेचे नियोजन केलं जाण्याची शक्यता आहे. तर तिथेच खाजगी कार्यालयांनी देखील आपल्या वेळांचे नियोजन केले पाहिजे, कामाच्या वेळा बदलल्या पाहिजे, अशी चर्चा आता सुरू झाले आहे.