मराठा मोर्चामुळे पंढरपुरात संचारबंदी! जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 पासून ते 7 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व एस.टी. बस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

68

मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज या संघटनांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी 7 नोव्हेंबरपासून पंढरपूर-अकलूज-बारामती-आकुर्डी-निगडी-मावळ-वाशी या मार्गाने पायी दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 पासून ते 7 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सांचारबंदी लागू केली.

मराठा आरक्षणासह इतर न्याय हक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई पायी दिंडीने जाणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंढरपूर शहरात होणारी गर्दी टाळता यावी. यासाठी 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 पासून ते 7 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व एस.टी. बस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात 6 नोव्हेंबरला रात्री 12 पासून ते 7 नोव्हेंबरला रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

(हेही वाचा : संकटात महाविकास पाठीशी राहिली नाही! सरनाईकांनी ‘त्या’ पत्रामागील मांडली व्यथा)

मराठा संघटनांनी मोर्चाला जमण्याचे केले आवाहन!

मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज या संघटनांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी 7 नोव्हेंबरपासून पंढरपूर-अकलूज-बारामती-आकुर्डी-निगडी-मावळ-वाशी या मार्गाने पायी दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनांनी मराठा समाजातील नागरिकांना एकत्र येण्यासाठी आवाहन केले आहे. मोर्चामुळे एस.टी. बसमध्ये आंदोलनकर्त्यांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. सुरक्षित अंतराचे पालन होणार नाही. आंदोलनकर्ते एकत्र जमल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य व जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

मोर्चेकरांना पंढरपुरात येण्यात विरोध!

महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफाळा ते पश्‍चिम द्वार परिसर, विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग याठिकाणी संचारबंदी लागू राहणार आहे. नामदेव पायरी दर्शन सर्वांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. पंढरपूर शहरात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील मोर्चात सहभागी होण्यासाठी येणारे आंदोलनकर्ते, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना 5 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपासून ते 7 नोव्हेंबर 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

(हेही वाचा : सरकारने लोकशाहीला कुलूप लावले! देवेंद्र फडणवीस आक्रमक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.