अमेरिका आणि एकूणच जगातील आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला (Tesla) भारतातून यावर्षी १.७ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा मोठी आयात करणार आहे. हा करार अंतिम टप्प्यात आहे. आणि तो प्रत्यक्षात आला तर टेस्लाच्या गाड्यांमध्ये भारतात बनलेले सुटे भाग दिसतील. वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी एका खाजगी कार्यक्रमात सांगितलं.
गेल्यावर्षीही टेस्लाने (Tesla) भारतातून १ अब्ज मूल्याचे सुटे भाग विकत घेतले होते. पण, यंदा भारतातून होणारी ही निर्यात दुपटीने वाढू शकेल. ‘इलेक्ट्रिक वाहनं हे चारचाकी गाड्यांचं भविष्य आहे. आणि या बाजारपेठेत भारताला चांगली संधी आहे,’ असं पियुष गोयल यांनी सांगितलं.
कारचे सुटे भाग बनवण्याच्या उद्योगात भारताचा वाटा सध्या जागतिक स्तरावर कमी आहे. पण, भारतीय जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा २.५ टक्क्यांचा आहे. आणि २०२५ पर्यंत जागतिक बाजारपेठेतही भारतीय कंपन्या जगातील तिसरा पुरवठादार देश होण्याच्या तयारीत आहे.
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात टेस्ला (Tesla) कंपनीचे सर्वेसर्वा आणि जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच टेस्ला कंपनी भारतातून सुट्या भागांची आयात वाढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मस्क आणि केंद्रसरकार यांच्या दरम्यान विविध करांमध्ये सवलतींवरून बोलणीही सुरू झाली होती.
आताही नवीन करार अंतिम टप्प्यात आला आहे. सध्याचा करार सुट्या भागांसाठीचा असला तरी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एलॉन मस्क भारतातील गुंतवणुकीविषयी सकारात्मक असल्याचं बोललं जातं. कारण, यावर्षी जून महिन्यातल्या दोघांच्या बैठकीनंतर मस्कने ‘भारतात गुंतवणूक वाढावी यासाठी नरेंद्र मोदी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. आणि आम्हालाही भारतात गुंतवणूक वाढवण्यात रस आहे,’ असं वक्तव्य केलं होतं.
भारतात टेस्लाची नवीन पुरवठा साखळी विकसित करण्यासाठीही मस्क उत्सुक आहे. तसंच टेस्ला गाड्यांसाठी भारत एक प्रमुख उत्पादन केंद्र बनावं तसंच इथं बॅटरी उत्पादन व्हावं अशीही मस्क यांची इच्छा होती. पण, मे महिन्यात केंद्रीय पातळीवर झालेल्या चर्चेनंतर मस्क यांनी आपली योजना तूर्तास रद्द केली होती. भारतातील आयात शुल्क त्यांना जास्त वाटलं होतं. त्यामुळे सध्या टेस्लाच्या कार मात्र भारतात दिसणार नाहीत.
Join Our WhatsApp Community