मुंबईत यापुढे उभारण्यात येणाऱ्य प्रत्येक उड्डाणपुलांवर आता ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत स्थानिकांच्या तक्रारींनंतर उड्डाणपुलांवर ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्यात येत होती, परंतु आता विकास आराखड्यातील तरतुदीनुसार ही यंत्रण बसवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
( हेही वाचा : अवघ्या २ दिवसात गंगा विलास क्रूझ नदीत अडकले; प्रवाशांना होडीतून आणले किनाऱ्यावर, काय आहे कारण? )
मुंबईत जे जे उड्डाणपुलासह इतर पुलांवरील वाहतुकीमुळे तसेच वाहतूक कोंडीमुळे मोठ्याप्रमाणात आवाजाचे प्रदुषण होत असल्याने या तक्रारींनंतर महापालिकेसह शासनाने आपल्या अखत्यारितील पुलांवर ध्वनीरोधक यंत्रणा बसवली होती. त्यानुसार बोरीवली, दादर टी टी, परेल टी टी, माटुंगा सर्कल तसेच शीव आदी पुलांवर ध्वनीरोधक यंत्रणा बसवली. परंतु आता महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात अशाप्रकारे उड्डाणपुलांवर ध्वनीरोधक यंत्रण बसवणे बंधनकारक केले आहे.
पाच वर्षांपूर्वी भाजपचे तत्कालिन नगरसेवक संदीप पटेल यांनी मुंबईत बांधण्यात आलेल्या तथा बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांवर ध्वनीरोधक यंत्रण बसवणे बंधनकारक करण्यात यावे अशाप्रकारची मागणी केली होती. पटेल यांनी महापालिकेत मांडलेल्या ठरावामध्ये उड्डाणपुलांच्या आजुबाजूच्या निवासी, शालेय, कार्यालयीन, औद्योगिक इत्यादी इमारतीमधील नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी इत्यादींना ध्वनीप्रदुषणाचा सतत त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर विशेषत: मानसिक आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे,असे म्हटले आहे.