मॉन्सूनचा विदर्भात प्रवेश परंतु सीमाभागांवर पोहोचण्यासाठी विलंब

125

नैऋत्य मोसमी वा-यांनी गुरुवारी विदर्भात प्रवेश केल्याचे वेधशाळेने जाहीर केले. वेधशाळेने बुधवारी दिलेल्या अंदाजानुसार येथे नैऋत्य मोसमी वारे येण्यासाठी किमान तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार होती. मात्र प्रत्यक्षात गुरुवारी विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा या भागांत नैऋत्य मोसमी वा-यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले.  केवळ मध्यप्रदेशाला लागून असलेल्या गोंदियातील सीमा भागात पाऊस पडला नाही. राज्यात ९९ टक्के भाग नैऋत्य मोसमी वा-यांनी व्यापल्याचे वेधशाळेने जाहीर केले.

राज्यात दक्षिण कोकणमार्गे मान्सूनचा प्रवेश करण्याची वार्षिक तारीख ५ जून, तर संपूर्ण राज्य काबीज करण्याची वार्षिक तारीख ही १५ जून समजली जाते. गेल्या शुक्रवारी १० जून रोजी मान्सूनचा वेंगुर्ल्यात प्रवेश झाला होता. दुस-या दिवसापर्यंत वरुणराजाने मुंबईसह डहाणू, पुणे ते मध्य महाराष्ट्राचा काही भागही व्यापला होता. याबाबत खासगी हवामान अभ्यासकांकडून शंकाही व्यक्त करण्यात आली होती.

( हेही वाचा: Mumbai News: उंदराच्या ताब्यातून पोलिसांनी असे जप्त केले 10 तोळे सोने )

दोन दिवसांत बिहार, उत्तर प्रदेशातही मान्सून

त्यातच बुधवारी राज्यात नैऋत्य मोसमी वा-यांचा मराठवाड्यात प्रवेश झाला होता. गुरुवारी उर्वरित मराठवाडा व्यापत थेट वरुणराजाने विदर्भात झेप घेतली. अरबी समुद्रातील उत्तर भागांसह, गुजरातच्याही काही भागातील मान्सून पुढे सरकला. विदर्भाच्या दिशेने मान्सून पुढे सरकताना, मध्य प्रदेशातील दक्षिण भागांत, छत्तीसगढच्या दक्षिण भागांतही मान्सूनने प्रवेश केला. तेलंगणा राज्याचा संपूर्ण भागही मान्सूनने व्यापला. यासह ओडिसा राज्याचा दक्षिणेकडील भाग, आंध्र प्रदेशातील किनारपट्टीतील बहुतांश भाग ते थेट बंगालच्या उपसागरातील वायव्येकडील भागापर्यंत मान्सूनने मजल मारली. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून बिहार आणि उत्तर प्रदेशातही दाखल होईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.