मुंबई, पुण्यात मान्सून दाखल… प्रत्यक्षात घोषणेची घाई ?

प्रातिनिधीक छायाचित्र

रात्रभर विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या वरुणराजाने शनिवारी सकाळी अखेर मुंबईसह पुणे, ठाणे ते अगदी डहाणूपर्यंत प्रवेश केल्याचे भारतीय वेधशाळेने जाहीर केले. शुक्रवारी राज्यात वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झालेल्या वरुणराजाने एका रात्रीत मुसळधार पावसांच्या सरींच्या जोरावर थेट डहाणू ते थेट मध्य महाराष्ट्रापर्यंत आगेकूच केली. प्रत्यक्षात वा-यांची दिशा नैऋत्येकडे पूर्णपणे वळून अद्यापही मुंबईपर्यंत पोहोचलेली नसताना केवळ मुसळधार पावसाच्या नोंदीच्या आधारावर मान्सून दाखल झाल्याची घोषणा केल्याचा दावा खासगी अभ्यासकांनी केला आहे.

राज्यातील बहुतांश भागांत पूर्वमोसमी पावसाचा जोर

मान्सूनच्या आगमनापूर्वी अपेक्षित भागांत नैऋत्य मोसमी वारे पोहोचण्याअगोदर वा-यांची दिशा नैऋत्य दिशेकडे वळते. दिवसभर आकाश ढगाळ राहते. वातावरणातील या दोन प्रमुख बदलांच्या आधारावर तसेच विविध भागांत अडीच मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर, वेधशाळा संबंधित भागांत मान्सून आल्याचे जाहीर करते. मान्सूनच्या आगमनाअगोदर सायंकाळी प्रचंड गडगडाटासह पाऊस पडतो. शुक्रवारी सायंकाळी पुण्यात पूर्वमोसमी पावसाने दमदार कामगिरी केली. मुंबईसह उत्तर कोकणातील परिसरात पावसाची किमान दीड तास संततधार सुरु होती. मात्र अरबी समुद्रातून नैऋत्य दिशेतून प्रचंड वारे वाहत मान्सूनला केवळ रत्नागिरीतील हरणेपर्यंतच मुक्काम मिळाला. त्यामुळे केवळ अपेक्षित पाऊस झाल्याच्या आधारावर मान्सून मुंबईत दाखल झाल्याचा दावा खासगी अभ्यासकांनी केला. प्रत्यक्षात नैऋत्य दिशेकडून राज्यावर वाहणारे वारे रत्नागिरीतील हरणाईपर्यंतच पोहोचले. राज्यातील बहुतांश भागांत पूर्वमोसमी पावसाचा जोर आहे. पावसाचा जोर वाढताच वेधशाळेकडून मान्सूनच्या आगमनाची घोषणा होत असल्याने उर्वरित कोकणात, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील दोन दिवसांत मान्सून दाखल होईल, असाही अंदाज भारतीय वेधशाळेने जाहीर केला आहे.

( हेही वाचा: भाजपच्या ‘या’ दोन आमदारांनी जे काही केले, त्याने कांदेंचे वांदे झाले )

प्रत्यक्षात कुठे पोहोचलाय मान्सून

अरबी समुद्रावरुन वाहणारे वारे सध्या दक्षिण कोकणात आणि कोल्हापूर नजीकच्या भागांपर्यंत सक्रीय आहेत. या भागांत प्रत्यक्षात नैऋत्य मोसमी वारे येण्याचे वातावरणातील निकष पूर्ण झालेले आहेत.

गेल्या २४ तासांतील पावसाची नोंद –
रत्नागिरी – ७६.४ मिमी
ठाणे – ४१ मिमी
हरणाई – ६१.८
सांताक्रूझ – ४१.३ मिमी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here