गेल्या आठवड्यात मनसोक्त कोसळल्यानंतर राज्यात आता मुसळधार पावसाची शक्यता नाही. संपूर्ण देशात वेळेतच पोहोचलेले नैऋत्य मोसमी वारे लवकरच वायव्येकडून परतणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांच्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत मान्सून वायव्य भारतातील काही भागांतून परतीचा प्रवास सुरु करणार आहे.
आठवड्याच्या शेवटी मध्य महाराष्ट्रासह कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. आता कोकणात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता नाही, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात पुन्हा सोसाट्याचे वारे
जळगाव, अहमदनगर आणि पुण्यात रविवारपासून बुधवारपर्यंत सोसाट्याचे वारे वाहतील. या जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होईल. वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असेल. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह रविवारी धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथेही हलका पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात सोमवारीही हा प्रभाव राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद, जालना , परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असेल. तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊसही होईल. हेच वातावरण लातूर आणि बीड जिल्ह्यांत बुधवारपर्यंत तर उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार ते बुधवारपर्यंत असेल. विदर्भात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना गुरुवारपर्यंत दिसून येईल.
Join Our WhatsApp Community