परतीच्या पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. राज्यात पावसाचा मारा १५ ऑक्टोबरनंतरच कमी होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिली. परिणामी, राज्यातून नैऋत्य मोसमी वा-यांना माघारी फिरण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिस-या आठवड्यात मुहूर्त मिळेल.
मुंबई वगळता उत्तर कोकणात तसेच पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मंगळवारी पावसाने चांगली कामगिरी बजावली. दौंड, राजगुरूनगर तसेच पुरंदर भागांत पावसाचा दिवसभर मारा सुरु होता. मंगळवारी दिवसभरात साता-यात पाटणमध्ये ४१ मिमी पावसाची नोंद झाली. वाई, कराडमध्येही दिवसभर पावसाच्या सरींची हजेरी दिसून आली. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे ७० मिमी पाऊस झाल्याचे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले. बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेल्या नोंदीत साता-यातील अकोले तसेच जालना, परभणी आणि हिंगोली परिसरातही पावसाने रात्रभर दमदार कामगिरी केल्याचे दिसून आले. उस्मानाबाद येथील परांदा येथे ४० मिमी, लातूर य़ेथे रेणापूरमध्ये ४५ मिमी पाऊस झाल्याचे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने बुधवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारनंतर राज्यात पाऊस नसेल. बुधवारी सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांत सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस होईल. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्गात तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूरात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्येही वा-यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत पोहोचला असेल.
( हेही वाचा: आता एलॉन मस्क परफ्यूम विकणार? काय आहे कारण? नाव अन् किंमत ऐकून… )