राज्यातील जळगाव आणि डहाणूपर्यंत नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरल्याचे केंद्रीय वेधशाळेने जाहीर केले. ऐन ऑक्टोबर महिन्यात राज्यात परतीच्या पावसाने जोर धरल्याने नैऋत्य मोसमी वा-यांनी नऊ दिवसांच्या दिरंगाईनंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मुंबईत आणि मध्य महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी अजूनही परतीचा पाऊस सक्रीय आहे. पावसाचा जोर कमी होत तीन दिवसानंतर राज्यातील आणखी काही भागांतून मान्सून माघारी परतेल, असे केंद्रीय वेधशाळेने जाहीर केले.
राज्यात कुठून परततोय मान्सून?
३ ऑक्टोबरनंतर देशात नैऋत्य मोसमी पाऊस चांगलाच रेंगाळला होता. मध्य भारत तसेच दक्षिण भारतात पावसाच्या सरींना जोर आल्याने ऐन ऑक्टोबर हीटमध्ये वातावरण आल्हाददायक वाटत असले तरीही पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला होता. गुरुवारपर्यंत मुंबई व पुण्यात परतीचा पाऊस सक्रीय होता. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दुपारी केंद्रीय वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यांतील उर्वरित भागांतून माघारी फिरला. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढमधील ब-याचशा भागांतून नैऋत्य मोसमी वा-यांनी परतीच्या मार्गावर आहेत. या राज्यांतील उर्वरित भागांतून मान्सून तीन दिवसांनंतर पूर्णपणे निघून जाईल. राज्यातील काही भागांतून तसेच ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यातूनही येत्या तीन दिवसांत मान्सून परतण्यास सुरुवात होईल, असे केंद्रीय वेधशाळेने जाहीर केले.
(हेही वाचा रविवारी बाहेर पडताय? दोन्ही मार्गावर असणार मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)
Join Our WhatsApp Community