नैऋत्य मोसमी वारे अंदमानातून आता आगेकूच करत असल्याचे भारतीय वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले. अंदमानात मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला अनुकूल वातावरण असून, सोमवारपर्यंत दक्षिण अंदमानात पुढे वाटचाल करणार, असे पूर्वानुमान भारतीय वेधशाळेने दिले आहे. यासह नैऋत्य मोसमी वारे निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरातील आग्नेय दिशेकडे पुढे सरकतील, असादी अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वेगाने वारे वाहतील
येत्या पाच दिवसांत अंदमान-निकोबार बेटातील काही भागांत मुसळधार पाऊस होईल. या भागांत मेघगर्जनेसह जोरदार वारेही वाहतील. १७ तारखेपासून दोन दिवस वा-यांचा जोर अजून वाढेल. १७ ते १९ मे दरम्यान वा-यांचा वेग ताशी ४० ते ६० किलोमीटर राहील.
वेधशाळेचा अंदाज
गेला आठवडा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेल्या असानी चक्रीवादळानंतर अंदमान निकोबार बेटात मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळाले होते. शनिवारीच नैऋत्य मोसमी वा-यांनी अंदमानातील दक्षिणेकडील समुद्रात प्रवेश केला होता. यासह निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागांतही नैऋत्य मोसमी वारे पोहोचले होते. भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार २७ मेच्या अगोदर चार दिवस किंवा विलंबाने मान्सून केरळात पोहोचेल. सध्या केरळातही मान्सूनपूर्व पाऊस सुरू असल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली.
Join Our WhatsApp Community