काकाणी यांचा शांत, संयमी, मृदू स्वभाव, कामकाजाचा कितीही तणाव असला तरी डोके शांत ठेवून काम करण्याची सवय यामुळे कोविड कालावधीत आरोग्य खात्याला योग्य अधिकारी लाभला. एक सहकारी म्हणून काम करताना कधीही निराश न होणे, प्रत्येक गरजेच्या वेळी उपलब्ध असणे, प्रत्येक दूरध्वनी आणि संदेशाला प्रतिसाद देणे आणि विशेष म्हणजे कामकाजात अत्यंत व्यस्त असूनही दिलेल्या वेळेत प्रत्येक काम पूर्ण करणे, या सर्व गुणांचा मिलाफ काकाणी यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यासोबत त्यांनी आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता देखील जोपासली आहे. त्यामुळे ते सर्वार्थाने उजवे ठरतात, अशा शब्दांत महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याबाबत गौरव केला.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी हे शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार शनिवारी ३० एप्रिल २०२२ सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त सुरेश काकाणी यांचा महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करुन सत्कार करण्यात आला. कार्यालयीन कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्त सभागृहात हा छोटेखानी समारंभ पार पडला. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त अजीत कुंभार यांच्यासह विविध सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.
चहल यांचे गौरवोद्गार
महापालिका आयुक्त यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुरेश काकाणी यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून दिलेल्या योगदानाचा विस्तृत उल्लेख केला. कोविड विषाणू संसर्ग कालावधीत आरोग्य खात्याची धुरा वाहताना अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून सुरेश काकाणी यांनी दिलेले योगदान शब्दात व्यक्त करणे शक्य नसल्याचे सांगितले. फक्त कोविडच नव्हे तर इतर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठीही त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे ठरले, असे गौरवोद्गारही महापालिका आयुक्त चहल यांनी काढले.
काकाणींच्या व्यक्तिमत्व विशेषांचा गौरव
अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सह आयुक्त सुनील धामणे आदी मान्यवरांनीही काकाणी यांच्यासोबत केलेल्या कामकाजाच्या आठवणी सांगितल्या. कामकाजाचा थोडाही तणाव जाणवू न देता, पूर्णपणे झोकून देत, शांतचित्ताने आणि अतिशय पद्धतशीररित्या कामकाजाची धुरा वाहणे, मृदू संभाषण या काकाणी यांच्या व्यक्तिमत्व विशेषांचा सर्वच मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला. कोविड व्यवस्थापन करताना महापालिका प्रशासनाचा कणा बनून काकाणी खंबीरपणे कार्यरत राहिले आणि त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाला योग्य दिशा मिळत गेली, असा सूर यातून उमटला.
सर्वांचे मानले आभार
सत्काराला उत्तर देताना सुरेश काकाणी यांनी कोविडसारख्या वैश्विक आपत्तीतून मुंबई महानगर तावून-सुलाखून बाहेर पडले आहे. पण मुंबई महापालिका किती जागरूक, सतर्क आणि तत्पर आहे, हे फक्त मुंबईनेच नव्हे तर संपूर्ण राज्याने, देशाने आणि जगाने देखील पाहिले, असे सांगितले. कोविडचे व्यवस्थापन करताना महापालिकेत आयुक्तांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरले. संपूर्ण आरोग्य यंत्रणेसोबत सर्व नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, कॉर्पोरेट, प्रसारमाध्यमं अशा सर्वच घटकांनी मनापासून आणि एकजुटीने काम केले.
झोकून देऊन काम केले तर कठीण नाही
आधी कोविडचे रुग्ण आपल्याकडे येत होते. नंतर महापालिका थेट घरोघरी जाऊन प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचू लागली. अशा बदलातून आपण काय आहोत, किती उत्कृष्ट काम करू शकतो, हे महापालिकेने सिद्ध करून दाखवले, असे त्यांनी सांगितले. कोणतेही काम करताना त्यात समर्पित भावनेने, झोकून देऊन काम केले तर काहीही कठीण नाही. प्रत्येकाने आपल्या कारकिर्दीत आणि आयुष्यात ही गोष्ट स्मरणात ठेवून कार्यरत राहिले पाहिजे, असे सांगून मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कामकाज करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य शासनाचेही आभार मानले. या समारंभाचे सूत्रसंचालन जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी केले.
Join Our WhatsApp Community