अवयवदानासाठी केईएम रुग्णालयात आता विशेष डॉक्टरांची टीम; असे होईल काम

97

अवयवदानासाठी मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णालयात दाते मिळणे जवळपास अशक्यप्राय झाले आहे. सरकारी तसेच पालिका रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांची संख्या मोठी असताना या रुग्णांच्या मृत्यूपश्चात नातेवाईकांकडून अभावानेच अवयवदान होते. अवयवदानाला वेग मिळावा म्हणून पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात आता तीन सल्लागार डॉक्टर्स नियुक्त केले जाणार आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी ही माहिती दिली.

केईएम रुग्णालयात गुरुवारपासून उतीपेशी बँक सुरु करण्यात आली आहे. यावेळी अवयवदान प्रक्रियेसाठी आवश्यक उपाययोजनांविषयी माहिती देताना डॉक्टर रावत यांनी पालिकेच्यावतीने केईएम रुग्णालयात तीन सल्लागार डॉक्टरांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती दिली. यात राष्ट्रीय कोविड कृती दलातील एका डॉक्टरांचाही समावेश आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णाला मेंदू मृत रुग्ण शोधणे, मृत रुग्णाच्या कुटुंबीयांना अवयवदानासाठी तयार करणे हे काम तीन सल्लागार डॉक्टरांकडून केले जाईल. अतिदक्षता विभागातील रुग्णांचे रक्तदाब तपासणे, हृदयाचे ठोके तपासणे, त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेणे, उपचारादरम्यान रुग्ण मेंदू मृत झाल्यास अवयवदानाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक काम पार पाडणे आदी महत्त्वाच्या जबाबदा-या या तीन सदस्यांवर दिल्या जातील.

( हेही वाचा: यवतमाळ येथील डॉक्टरवर चाकूने हल्ला; वाचा कुठे घडला प्रकार )

अवयवदानाची प्रक्रिया सांभाळणा-या देशाच्या प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे (रॉटो) पश्चिम विभागाचे मुख्य कार्यालय मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात आहे. या कार्यालयांतर्गत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात आणि गोवा येथील अवयव प्रत्यारोपणाचे काम पाहिले जाते. शिवाय राज्याच्या प्रत्यारोपण समन्वय समितीचे कार्यालयही (सॉटो) रॉटोसह उभारण्यात आले आहे. तरीही केईएम रुग्णालयाकडून अवयवदान चळवळीत फारसे योगदान मिळत नाही. मुंबईच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी)चे मुख्य कार्यालयही सायन येथील टिळक रुग्णालयात उभारण्यात आले आहे. परंतु टिळक रुग्णालयातूनही अवयवदानाबाबत योगदान होत नाही. गेल्या वर्षी झेडटीसीसीच्या सदस्यांनी टिळक रुग्णालयातील अधिष्ठातांशी भेट घेत यासंदर्भात चर्चा केली. अतिदक्षता विभागांत दररोज रुग्ण पाहायला परवानगी मिळावी, यासाठी ही बैठक घेतली गेली. रुग्ण डॉक्टरांकडून मेंदू मृत घोषित झाल्यास रुग्णांच्या कुटुंबीयांना अवयवदानासाठी संमती मिळवण्याचे काम सदस्यांकडून केले जाईल, असेही आश्वासन झेडटीसीसीच्या सदस्यांनी अधिष्ठातांना दिले. मात्र याबाबतीत अद्याप काहीच सकारात्मक पावले उचलली गेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.