घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा वेग मंदावणार! ‘ही’ आहेत कारणे…!

पुलावर दोन्ही बाजूने दर ५०० मीटरच्या अंतरावर आता गतीरोधक बसवले जाणार आहे.

123

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या घाटकोपर-मानखुर्द जोडमार्गावरील वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग उड्डाणपूल सध्या अपघाताचे केंद्र बनले आहे. हा उड्डाणपूल लोकांसाठी खुला केल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांचे अपघात होवू लागले असून यावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्याची उपाययोजना महापालिकेच्यावतीने राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पुलावर दोन्ही बाजूने दर ५०० मीटरच्या अंतरावर आता गतीरोधक बसवले जाणार आहे. तसेच पुलाचा पृष्ठभाग खरबडीत (मिलिंग) करणे आणि अतिरिक्त रम्बलर्स बसविण्याच्या उपाययोजनांचाही राबवण्याचा निर्णय महापालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचा वेग आता कमी होणार आहे.

पुलावरील वेग नियंत्रणात येत नाही!

घाटकोपर-मानखुर्द जोडमार्गावरील वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण १ ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले होते. परंतु या पुलावर सातत्याने भरधाव वाहनांना आपला वेग नियंत्रणात राखता येत नसल्याने अपघात होतात. याची दखल अखेर महापालिकेच्या पूल विभागाने घेतली आहे. हा उड्डाणपूल ५० किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहन नेण्यसाठी संकल्पित आहे. असे असले तरी, या उड्डाणपुलावरून चारचाकी व दुचाकी वाहनचालक खूप जास्त वेगाने वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अतिरिक्त रम्बलर्सही बसवणार

त्यामुळे या उड्डाणपुलावर वाहन चालकांचा वेग नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अतिरिक्त उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये पुलाच्या दोन्ही वाहिनीवर ५०० मीटर अंतरावर गतिरोधक बसविण्यात येणार आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावले जाणार आहे. याशिवाय, गतिरोधक दर्शक फलक बसविणे, डांबरी पृष्ठभागावर (मास्टिक अस्फाल्टवर) वाहने घसरू नये, यासाठी पृष्ठभाग खरबडीत (मिलिंग) करणे आणि अतिरिक्त रम्बलर्स बसविणे, या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

त्यानंतरच अवजड वाहनांना प्रवेश

या उड्डाणपुलावरील मोहिते पाटील नगर जंक्शन येथे उच्च दाबाच्या तारा कमी उंचीवरून जात असल्यामुळे वाहतुकीदरम्यान वाहनांमध्ये विद्युत प्रेरण उत्पन्न होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता, या उच्च दाबाच्या तारांची उंची वाढविण्यासाठी  लागणाऱ्या जागेचा ताबा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच, या जागा ताब्यात मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत वीज तारा अधिक उंचीवर नेल्यानंतर या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.

पुलाचा पृष्ठभाग मानांकनानुसारच

या उड्डाणपुलावरील पृष्ठभागावर केंद्रीय रस्ते व वाहतूक यांच्या मानांकनाप्रमाणे व आय.आर.सी. मानकाप्रमाणे मास्टिक अस्फाल्ट टाकण्यात आले आहे. या मास्टिक अस्फाल्ट पृष्टभागावर ‘पृष्ठभाग निर्देशांक’ चाचणी करण्यात आली आहे. त्यात, हा पृष्ठभाग मानकाप्रमाणेच असल्याचे निदर्शनास आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.