रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

107

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबई अल्ट्राने टाटा मेमोरियल सेंटरच्या सहयोगाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण याने देखील या शिबिरात भाग घेतला होता. या भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी शनिवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी टाटा मेमोरिअल ट्रस्ट आणि मुंबई अल्ट्राने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचे विशेष आभार मानले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह मुंबईमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला असून, हाच तुटवडा भरून काढण्यासाठी मुंबई अल्ट्रा’ने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कॅन्सरग्रस्तांवर उपचार करणारी टाटा मेमेरिअल ट्रस्ट देशातील सर्वात मोठी संस्था असून, दरवर्षी ७० हजारांहून अधिक कॅन्सरग्रस्तांवर उपचार केले जातात.

या कार्यक्रमाचे अँबेसिडर मिलिंद सोमण यांनी यावेळी मी पहिल्यांदाच रक्तदान केल्याचे सांगत मुंबई अल्ट्रा आणि टाटा मेमोरिअल सेंटरचे आभार मानले. तसेच हा एक चांगला उपक्रम असून, जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही ३ महिन्यातून एकदान रक्तदान करायला हरकत नसल्याचे मिलिंद सोमण यावेळी म्हणाला. टाटा मेमोरिअल ट्रस्टचे मेडिसीन विभाग प्रमुख प्रो. सुनील राज्याध्यक्ष यांनी सर्व मुंबईकरांचे आभार मानत सर्वांनी रक्तदान करायला हवे असे सांगत विविध भागामध्ये अशी शिबिरे होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.