Devendra Fadanvis : श्री शनेश्वर देवस्थानाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

349
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये होत असलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचाराची चौकशी सचिव दर्जाचा अधिकारी करणार असून श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी विधान परिषदेत शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर संस्थान येथे विश्वस्त मंडळाच्या परवानगीने कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा प्रकार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून विधान परिषदेत मांडला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी चौकशी करण्याचे तसेच सभागृहात पारित झालेल्या कायद्याची अमलबजावणी करू अशी माहिती दिली.

अनधिकृतपणे १८०० कामगारांची केली भरती

शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानमध्ये विश्वस्त मंडळाने अनधिकृतपणे १८०० कामगारांची भरती केली. ही संख्या गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त असून यातील  शेकडो कामगारांना घरी बसून पगार दिला जात आहे. मंदिराच्या चौथाऱ्यावर दर्शनासाठी ५०० रुपयांची बनावट पावती छापून २ कोटी रुपये उकळण्यात आले. देवस्थानला मिळालेले दान एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. २४ तास वीज पुरवठा असताना महिन्याला ४० लाख रुपयांचे डिजेल जाळण्यात आले. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी २० कोटींचा निधी देण्यात आला होता, तथापि, ५० कोटी खर्च करूनही अद्यापही ५० ते ६० टक्के काम शिल्लक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

सचिव दर्जाचा अधिकारी नेमून चौकशी करणार 

२०१८ मध्ये भाजप सरकारने श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व्यवस्था अधिनियम २०१८ हा कायदा दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केला होता. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी विनंती बावनकुळे यांनी सभागृहात केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सचिव दर्जाचा अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे, संस्थांच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करण्याचे व लवकरात लवकर शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.