मार्च २०२१ साठी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता एसएससी बोर्डाने विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांचा निकाल लावला, त्यानंतर निकालही ऑनलाईन जाहीर करण्याचा निर्णय घेतला. कोरोना प्रतिबंधामुळे १६ लक्ष विद्यार्थी आणि त्यांचे पालक साहजिकच एकाच वेळी मंडळाने दिलेल्या वेबसाईटवर तुटून पडले आणि सगळ्या वेबसाईट तब्बल ६ तास बंद पडल्या. या सगळ्या गोंधळाला माध्यमिक शिक्षण मंडळाची घिसाडघाई कारणीभूत आहे, असा ठपका आता चौकशी समितीच्या अहवालातून लावण्यात आला आहे.
तांत्रिक तयारी नसताना घेतला निर्णय!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल १६ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार होता. त्यासाठी मंडळाने ३-४ वेबसाईट जाहीर केल्या होत्या. हे निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार होता, त्यामुळे त्याआधीच लाखो विद्यार्थी आणि पालक लॉगिन करून बसले होते. परिणामी काही मिनिटातच एक एक करत सगळ्या वेबसाईट क्रश झाल्या. त्या तब्बल ६ तास बंदच होत्या. तोपर्यंत १६ लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक, शिक्षक निकाल पाहता येत नसल्याने चांगलेच हवालदिल झाले. मंडळाने दहावी-बारावीचे निकाल ऑनलाइन लावण्यास सुरुवात केल्यानंतर असे प्रथमच घडत होते. या गोंधळानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल विभागाला सादर करण्यात आला आहे. मंडळाची तांत्रिक तयारी नसताना निकाल जाहीर करण्याची घाई या गोंधळाला कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. त्याचबरोबर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून करावयाच्या तांत्रिक उपाययोजनाही समितीने सुचविल्या आहेत.
बारावीच्या वेळी सुधारणा!
दहावीच्या निकालादरम्यान आलेल्या अनुभवातून शहाणे होत मंडळाने ३ ऑगस्ट रोजी बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करताना पुरेशी तांत्रिक काळजी घेतली. बारावीला १३ लाख विद्यार्थी असताना निकाल ऑनलाइन जाहीर झाल्या बरोबर अवघ्या तासाभरात तब्बल साडेतीन कोटी ‘हिट्स’ आल्याचे त्यावेळी दिसून आले.
Join Our WhatsApp Community