दहावीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता आणखी दिरंगाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण माध्यमिक शालान्त परीक्षा महामंडळाच्या ९ विभागांपैकी ४ विभागांना निकालाचे काम अद्याप पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्यांना एसएससी बोर्डाला नियोजित वेळेत दहावीचा निकाल सादर करता आला नाही. म्हणून शालेय शिक्षण विभागाने १०वीचा निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे ठरवले आहे, मात्र आता निकाल जाहीर होण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तिसऱ्यांदा दिली मुदतवाढ!
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना त्यांचा दहावीचा निकाल ३० जूनपर्यंत बोर्डाला सादर करण्याचा आदेश दिला होता, मात्र शाळांना अंतर्गत मूल्यमापन करणे तेवढया वेळात शक्य झाले नाही, म्हणून ही मुदत २ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली. मात्र शुक्रवार, २ जुलैपर्यंतही निकालाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे अखेर त्याला ५ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. अशा प्रकारे निकालाचे काम पूर्ण होत नसल्याने बोर्डाकडून मुदत वाढ दिली जात आहे.
बोर्डाच्या ४ विभागांचे निकाल रखडले!
यंदाच्या वर्षी १७ लाख विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम सुरु आहे. १५ जूनपासून हे काम सुरु झाले असून १५ दिवसांची मुदत बोर्डाने दिली होती. त्यातील ३-४ दिवस निकाल कसा बनवायचा, मूल्यमापन कसे करायचे, तो संगणकीय प्रणालीत कसा भरायचे हे समजून घेण्यात गेले. ग्रामीण भागात तर १०वीचे ओंनलाईन वर्गही भरले नव्हते. अशा वेळी १०वीच्या वर्षभराचे मूल्यांकन कशाच्या आधारे करायचे, असा प्रश्न शाळांना पडला आहे. त्यातूनही वेळ काढत शाळांमध्ये निकालाचे काम सुरु झाले. याचा परिणाम म्हणून बोर्डाच्या ४ विभागांचे निकाल रखडले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
मुंबई विभागाचा १७ टक्के निकाल बाकी!
मुंबई विभागामुळे दहावीच्या निकालाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील शिक्षक आजही मूलभूत समस्यांना सामोरे जात निकालाचे काम करत आहेत. येथील ७० टक्के शिक्षक हे ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून येतात. त्यांना शाळेत येण्यासाठी लोकल ट्रेन प्रवासाशिवाय पर्याय नाही, मात्र राज्य सरकारने अखेरपर्यंत शिक्षकांना लोकल प्रवासाला परवानगी दिली नाही. त्यामुळे शिक्षकांना शाळेत दररोज येणे अशक्य होत आहे. त्यामुळेही मुंबईतील निकालाचे काम म्हणाव्या तितक्या गतीने होत नाही. बोर्डाच्या म्हणण्यानुसार मुंबई विभागाचे निकालाचे काम १७ टक्के राहिले आहे. वास्तविक मुंबई विभागाचे निकालाचे काम खूप प्रमाणात रखडले आहे. एकट्या पश्चिम विभागाचे काम ४० टक्के बाकी आहे. मागील २ आठवडे शिक्षकांनी आंदोलने केली, ४-५ वेळा पत्रव्यवहार केला तरी सरकारने दुर्लक्ष केले, त्यामुळे निकालावर परिणाम होत आहे, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना म्हणाले.
Join Our WhatsApp Community