महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दहावी, बारावीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मंडळाने विद्यार्थ्यांच्या प्राथमिक माहितीसाठी वेळापत्रक वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे. शाळांमध्ये पाठवण्यात आलेल्या ऑफलाईन वेळापत्रकावरच विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. याशिवाय यंदाच्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थी हिताचा बदल करण्यात आला आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आणि पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे निर्णय
दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने या गोष्टीची दखल घेत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. 70, 80, 100 गुणांचे लेखी परीक्षेचे पेपर असतील, त्या पेपर साठी 30 मिनिटे अधिक वेळ दिलेला आहे. तर 40, 50, 60 गुणांचे लेखी पेपर असतील त्यासाठी 15 मिनिटे अधिक वेळ देण्यात आल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ट्विट करुन दहावी बारावीच्या परीक्षा कशा होणार याबद्दलचा संभ्रम दूर झाल्याचे म्हटले आहे.
(हेही वाचा 2022 मध्येही ओमायक्रोनचा विस्फोट? थर्टी फस्टपासून सुरुवात)
Join Our WhatsApp Community