कोरोना पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनाआधारे निकाल जाहीर करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्यातील शाळा, महाविद्यालये पूर्वपदावर येत आहेत. यामुळेच राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२२ याच कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत, असे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
वेळापत्रकास मान्यतेची प्रतीक्षा
राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नियोजित वेळापत्रक मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आले असून, ही मान्यता मिळण्यासाठी मंडळ प्रतीक्षा करत आहे. दहावी-बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असून त्यासाठीची नियोजन आणि कार्यपद्धतीसाठीचे वेळापत्रक मंडळाकडून मागील आठवड्यात शालेय शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले आहे. मान्यता मिळाल्यास तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : हात प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी! परळच्या ग्लोबल रुग्णालयाचा दावा )
परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये?
नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा ऑफलाईन पद्धतीने फेब्रुवारी-मार्च दरम्यान घेण्याचे आयोजिले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रात सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. तसेच, राज्यातील शाळा-महाविद्यालये उशिरा सुरू झाल्यामुळे परीक्षेच्या तारखांमध्ये सुमारे आठवड्याभराचा फरक असणार आहे.
Join Our WhatsApp Community