यंदाचा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के!

कोकण विभागाचा निकाल (100%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (99.84%) आहे.

कोरोनामुळे २०२०-२१ या वर्षीची दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर तयार केलेला यंदाचा दहावी बोर्डाचा निकाल शुक्रवारी, १६ जुलै रोजी जाहीर झाला. राज्याचा हा निकाल तब्बल 99. 95 टक्के लागला आहे. तर कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

कोकण विभागाचा निकाल 100%!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. सन 2020-21 वर्षातील एसएससी परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 75 हजार 806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन झाले. त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.95 आहे. विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल 100 टक्के सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 99.84 टक्के आहे.

(हेही वाचा : Maharashtra SSC Result 2021: 10वीच्या निकालाचा भोपळा आज फुटणार… दुपारी होणार निकाल जाहीर)

यंदाही मुली सरस!

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96 टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02 टक्केने जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 82 हजार 802 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 82 हजार 674 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे त्यापैकी 74618 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 90.25 आहे.

यंदाचा निकाल न भूतो न भविष्यति!

27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असून राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत अर्थात ७५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झालेले आहेत. 6 लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2 लाख 18 हजार 070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 9 हजार 356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील 22 हजार 767 शाळांतून 16 लाख 58 हजार 614 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सन 2021 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2020 च्या निकालाच्या तुलनेत 4.65 % जास्त आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. दरम्यान यंदाचा निकाल सर्वस्वी शाळांच्या अधिकारात लागल्याने शाळांनी विद्यार्थ्यांना गन देताना फ्री हॅन्ड दिला होता का, याला पुष्टी देणारा हा निकाल आहे., यंदाचा दहावीच्या बोर्डाचा निकाल न भूतो न भविष्यति असा लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here