सुशांत सावंत
कोरोनामध्ये अख्या महाराष्ट्र थांबला पण लालपरी थांबली नाही. महाराष्ट्राच्या गावाखेड्यात लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटीने कोरोना काळातही अविरत सेवा दिली. मात्र अविरत सेवा देणाऱ्या याच लालपरीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना एक दोन नव्हे तर तब्बल ३ महिने पगारच मिळालेला नाही, त्यामुळे कोरोना महामारीमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसमोर जगायचे तरी कसे हा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या एसटी महामंडळामध्ये ९८ हजार कर्मचारी काम करत असून, हे सर्व कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब मात्र याबाबत सरकारने पैसे द्यावेत, तरच पगार देऊ, असे म्हणत आहेत.
१० हजार कर्मचाऱ्यांना नारळ
आधीच मागील ३ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार थकलेला असताना महामंडळाने आता पत्रक काढून १० हजार एसटी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यामुळे महामंडळाच्या या कठोर निर्णयामुळे कर्मचाऱी पुरते हवालदिल झाले आहेत.
सरकारने निधी दिल्यास वेतन देऊ – परिवहन मंत्री
कामगार कपातीबाबत खुलासा करताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले कि, एसटी महामंडळाने कुठेही कर्माचारी कपात केली नाही. जे चार हजार कर्मचारी भरती करणार होतो, ती भरती थांबण्यात आली आहे. ही भरती टप्याटप्यात करणार असल्याचे महामंडळाने कळवले आहे. तसेच कोरोनाच्या संकटातमुळे आर्थिक कुचंबना होत असलेल्या महामंडळाचा डोलारा कोलमडला आहे. एक लाख कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे पगार थकले आहेत. एसटी आधीच पाच हजार कोटी रुपयांनी तोट्यात धावत होती. त्यात आता कोरोनामुळे दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे. सरकारकडे ४८० कोटी मागितले आहेत. पैसे मिळाल्यास या पुढील पगार होतील, असे अनिल परब म्हणाले.
एसटी सुरु पण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्यात कोरोना काळापासून एसटी कर्मचाऱ्यांनीन सेवा बजावली आहे आणि बजावत आहेत. मात्र यावेळी चालक-वाहकांच्या सुरक्षेचा सरकारने काही विचार केला आहे का? असा सवाल एसटी संघटना करत आहेत. तसचे विम्याची मुदत आता संपत असून, यापुढे जर कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांना काही झाले तर त्यांच्यासाठी काही तरतूद केली आहे का? असा सवाल एसटीच्या संघटनांनी केली आहे. दोन हजार कोटींची तात्पुरत्या स्वरुपाची मदत एसटीला द्यावी अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. आज जर कामगारांना पगार मिळाला नाही तर सैन्य उपासी कसे लढेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.