-
प्रतिनिधी
यापुढे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली. “हा माझा शब्द आहे आणि याची जबाबदारी मी स्वीकारतो,” असे नि:संदिग्ध आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य, परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
आर्थिक अडचणींवर मात करणार
सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे मार्च महिन्यात ८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांना केवळ ५६% वेतन देण्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढे असे होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. “महिनाभर कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार ७ तारखेला जमा होईल. यासाठी मी स्वतः राजशिष्टाचार बाजूला ठेवून अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन. कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही, याची जबाबदारी माझी आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
(हेही वाचा – Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेल्या विनेश फोगाटला हरयाणा सरकारकडून ४ कोटी रुपये)
एसटी ही महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’
माध्यमांशी संवाद साधताना सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, “राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ आहे. भविष्यात एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रवासीभिमुख करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.” यासाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन तसेच एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रवाशांच्या सुविधांसाठी ठोस पावले
एसटीच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी अनेक निर्णय घेण्याचे संकेत सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले. यामध्ये बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अत्याधुनिक, स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्याचा मानस आहे. प्रवाशांच्या, विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसस्थानकावर आणि नवीन बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटण आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली जाणार आहे.
(हेही वाचा – नुसरत भरुचाने घेतली PM Narendra Modi यांची भेट; ‘या’ मदतीसाठी मानले आभार)
बसस्थानकांचे आधुनिकीकरण
एसटीच्या बहुतांश जागांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर खासगी विकासकांच्या सहभागाने काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६६ जागांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील जागांचा विकास होणार असून, एसटीच्या अविकसित जागांचा कायापालट होईल, असे सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले.
२५ हजार नवीन बसेस ताफ्यात सामील होणार
एसटीच्या जुन्या बसेस स्क्रॅप करून त्यांच्या जागी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यंदा २,६४० ‘लालपरी’ बसेस ताफ्यात दाखल होणार असून, त्यापैकी ११३ आगारांमध्ये ८०० हून अधिक बसेस प्रवासी सेवेत सामील झाल्या आहेत. सध्या ३ हजार नवीन बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी मिडी बसेस, तसेच शहरी भागातील प्रवाशांसाठी २०० अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जाणार आहेत. “शहरांपासून खेड्यांपर्यंत, महानगरांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी प्रतिपादन केले.
(हेही वाचा – IPL vs PSL : पीएसएल ऐवजी आयपीएल निवडल्याबद्दल कॉर्बिन बॉशने मागितली पाक चाहत्यांची माफी)
नव्या दिशेने वाटचाल
एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रवासीभिमुख बनवण्यासाठी परिवहनमंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि ठोस निर्णयांचा पाठपुरावा कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. येत्या काळात एसटीच्या सेवेत मोठ्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community