छ. शिवाजी महाराज मैदानाच्या नुतनीकरणाला स्थायी समितीची मंजुरी!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा सर्व खर्च सीएसआर निधीतून करण्याची मागणी केलेली असताना, या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी वाहिन्या टाकणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, मैदानाचा समतल राखणे तसेच पुरातन वारसा असलेल्या प्याऊंचा जिर्णोद्धार आदींच्या माध्यमातून नुतनीकरणावर सुमारे ३ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. याबाबतच्या कामाला स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा सर्व खर्च सीएसआर निधीतून करण्याची मागणी केलेली असताना, या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

पार्काचे होणार नुतनीकरण

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान(पार्क)मध्ये धुळीच्या प्रदुषणामुळे स्थानिक रहिवाशांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच शिवाजी महाराज पार्क हे उंच-सखल असल्यामुळे पावसाळ्यात तिथे पाणी साचते. खेळाडूंना विविध खेळ खेळण्याकरता अडचणी येतात. तसेच या पार्कमध्ये अस्तित्वात असलेली पुरातन वास्तू वारसा असलेले प्याऊ जीर्ण अवस्थेत आहे. या सर्व स्थितीवर मात करुन या पार्काचे नुतनीकरण करण्याचा निर्णय जी-उत्तर विभागाने घेतला आहे. हे काम पावसाळा वगळता पुढील सहा महिन्यांमध्ये करणे आवश्यक असेल. यासाठी दिपेश कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचाः खुशखबर! आता 500 रुपयांत आरटीपीसीआर चाचणी! )

डिसेंबरपूर्वीच काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

विशेष म्हणजे या सर्व कामांसाठी कार्यालयीन अंदाज हा ४ कोटी ०७ लाखांचा होता. पण कंत्राट कंपनीने २८ टक्के कमी बोली लावत, हे काम विविध करांसह ३ कोटी ३७ लाख रुपयांमध्ये मिळवले आहे. हे काम करण्यासाठी खुद्द शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला. या प्रस्तावित कामांची पाहणी केल्यानंतरच निविदा प्रक्रिया जी-उत्तर विभागाने रावबली होती. त्यामुळे शिवसेनेने या नुतनीकरणाचे काम डिसेंबरपूर्वीच पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव पटलावर येताच समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तो मंजूर केला. मात्र, या प्रस्तावाबाबत कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी हरकत किंवा आक्षेप घेतला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here