गोवरसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करा, आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

मुंबईत गोवरचे रुग्ण वाढू लागल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांचे लसीकरण वाढवा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करा आणि सर्वेक्षण करून संशयित लक्षणे असणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

( हेही वाचा : हिवाळी अधिवेशनात महिला सदस्यांसाठी एक दिवस राखीव ठेवण्याचा विचार; राहुल नार्वेकरांची माहिती)

आरोग्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेमार्फत शहरातील काही भागात राबविण्यात येणाऱ्या गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि आयुक्त डॉ. तुकाराम मुंढे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ डॉ. राहुल शिंपी, राज्य साथरोग अधिकारी डॉ प्रदीप आवटे उपस्थित होते.

डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, मुंबई शहरातील आठ विभागांमध्ये मुलांना गोवरची लक्षणे आहेत. या भागात पथकांमार्फत मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. लक्षणे आढळल्यास मुलांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा हजार मुलांचे लसीकरण केले आहे. येत्या काही दिवसांत सुमारे ५० हजारांहून अधिक मुलांना लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे.

यावर सावंत यांनी सांगितले की, संबंधित आठ वॉर्डमध्ये विशेष पथकांच्याव्दारे सर्वेक्षण करावे. यासाठी आवश्यक असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाचे मनुष्यबळ पुरवले जाईल. मुंबई बरोबरच गोवरची लक्षणे आढळलेल्या मालेगाव आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका परिसरातही सर्वेक्षण करावे. तेथेही लसीकरण वाढवावे. मुलांचे लसीकरण करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करावे. समुपदेशन करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here