पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास सुरू आहे. या विकासात स्थानिक तरुणांना सामावून घेणे आवश्यक आहे. यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील येरवडा आणि हवेली येथील नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी जलद गतीने करावी. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवार, ६ सप्टेंबर रोजी मंत्रालयात कौशल्य विकास विभागाचा आढावा घेतला. बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सुनील टिंगरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – Body Bag Scam : बॉडी बॅग घोटाळा – माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स)
या संस्थेला लोहगाव येथे ५ एकर जागा देण्यात आली आहे. या जागेत प्रशासकीय इमारत आणि कार्यशाळेचे बांधकाम करण्याबाबतचा सुनियोजित आराखडा तयार करा. ही संस्था सर्वसाधारण गटात मोडणारी असल्याने बांधकामासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रम शिकविण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व स्थानिक गरजा विचारात घेऊन इंडस्ट्री ४.० अंतर्गत रोबोटिक्स, सीएनसी मशीन हँडलिंग, मेकॅनिक्स यासारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत. यामुळे परिसरात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी निकडीची पदे तात्काळ भरण्याची प्रक्रिया सुरू करा. याबाबत संबंधितांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community