राज्याचे नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी आपला पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांनी वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना २० जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली. (Dinesh Waghmare)
(हेही वाचा- लहान कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करू; कामगार मंत्री Akash Fundkar यांचे प्रतिपादन)
दिनेश वाघमारे यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक (१९८७ ) केले आहे. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी संगणकशास्रात एमटेक (१९८९); तर यूकेमधून ‘विकास आणि प्रकल्प नियोजन’ या विषयात एमएस्सी (२००७ ) केले आहे. १९९४ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. (Dinesh Waghmare)
रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून दिनेश वाघमारे यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशीम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते. विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव तसेच नवी मुंबई आणि पिंपरी- चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. (Dinesh Waghmare)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community