गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना मोफत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वेळेत शिधा पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच औरंगाबाद आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणांनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर खाद्यतेल या ४ शिधा जिन्नसांचा समावेश असलेला “आनंदाचा शिधा” संच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार काही जिल्ह्यांत वितरण सुरू झाले आहे.
मात्र, संपामुळे काही ठिकाणी शिधा पोहोचण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” संचाचे वितरण २२ मार्च २०२३ पासून पुढील एक महिनाभर सुरु ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त ऑक्टोबर २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” संचाचे वितरण करण्यात आले होते.
(हेही वाचा – मुंबई मेट्रोचा प्रवास होणार आणखी सुखकर आणि किफायतशीर)
Join Our WhatsApp Community