साकीनाका प्रकरण : पीडित महिलेच्या मुलींना २० लाखांची मदत

गुन्ह्याचा संपूर्ण तपास १५ दिवसांत पूर्ण करून एका महिन्याच्या आत आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे आयुक्त नगराळे यांनी म्हटले आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणातील मृत पीडित महिलेच्या २ मुलींसाठी राज्य सरकारच्या वतीने २० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सोमवारी, १३ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.

१५ दिवसांत तपास पूर्ण!

या प्रकरणी आरोपीवर ऍट्रॉसिटी कायद्याचे कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार देखील पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने दिलेला घटनाक्रम नोंदवण्यात आलेला आहे, असे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास १५ दिवसांत पूर्ण करून एका महिन्याच्या आत आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे आयुक्त नगराळे यांनी म्हटले आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडून सरकारी वकील म्हणून राजा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे नगराळे यांनी सांगितले.

उच्च पदस्थांची बैठक

या संदर्भात सोमवारी मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव अप्पर गृहसचिव पोलिस महासंचालक यांच्यासोबत मुंबई पोलिसांची एक बैठक पार पडली असून या बैठकीत या घटनेतील बळीत महिलेच्या मुलींच्या पुनर्वसनासाठी २० लाखांची सरकारकडून मदत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सरकारी योजनामधून ज्या पद्धतीने मदत करता येईल ती करू, असे पोलिस आयुक्त नगराळे यांनी म्हटले आहे. साकिनाका पोलिसांनी या गुन्ह्यात दाखवलेली तत्परता आणि आरोपीला १२ तासांत अटक केली, त्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून कौतुक करण्यात आले असल्याचे नगराळे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here