उन्हाच्या झळांचे २५ बळी ?

उन्हाच्या झळांनी आतापर्यंत राज्यात ३८१ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत राज्यात संशयित २५ उष्माघाताचे बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यातील ६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नागपूरात २, जालना, उस्मानाबाद, अकोला आणि जळगावात प्रत्येकी एका नागरिकाचा उष्माचा दाह सहन न झाल्याने मृत्यू झाला. मात्र हा आकडा वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
…म्हणून माणसाला उष्माघाताचा त्रास होतो
राज्यात उष्णतेच्या लाटांनी मार्च महिन्यात दोनदा तर एप्रिल महिन्यात चारवेळा विदर्भातील जनजीवन मोडकळीस आणले. एप्रिल महिन्यात मध्य आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तसेच कोकणातील अंतर्गत भागांतही उष्णतेच्या लाटांची परिस्थिती उद्भवली. गेला संपूर्ण आठवडा राज्यातील बहुतांश भागांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्यापुढेच नोंदवले गेले. विदर्भातील चार जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले. मानवी शरीराला ३७ अंशापर्यंत कमाल तापमान सहन करता येते. तापमान ३७ अंशापलीकडे गेल्यास त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी होत जाते. परिणामी माणसाला उष्माघाताचा त्रास होतो.
मृत्यूमागे उष्माघात आहे का?  तपासणी सुरु
विदर्भातील चंद्रपूराने जागतिक नोंदीत नाव कोरल्याने उष्माघाताच्या रुग्णांची संख्याही चंद्रूपरात जास्त आढळली. चंद्रपूरात गेल्या दोन महिन्यांत २०२ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नागपूरात ७३, यवतमाळमध्ये २५ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. नागपूरातील इतर ७ रुग्णांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे का, याची तपासणी सुरु आहे. इतर संशयित मृत्यूंमध्ये औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, अमरावती येथील प्रत्येकी एका नागरिकांच्या मृत्यूमागे उष्माघाताचे कारण आहे का, याची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. जळगावातील ३, अकोल्यातील २ जणांच्या मृत्यूमागेही उष्माघाताचे कारण आहे का, हे तपासले जात आहे.

उष्माघाताच्या रुग्णांच्या जिल्हानिहाय नोंदी

जिल्हा – उष्माघाताची संख्या
 • पुणे – २
 • सोलापूर – १८
 • सांगली – १
 • औरंगाबाद (ग्रामीण )१
 • जालना – ५
 • परभणी – ४
 • हिंगोली – १
 • औरंगाबाद (शहर) – १
 • उस्मानाबाद – १
 • जळगाव (ग्रामीण) – ११
 • अहमदनगर – २
 • जळगाव (शहर)-१
 • अकोला – ६
 • अमरावती – २
 • यवतमाळ – २५
 • गोंदिया – ६१
 • चंद्रपूर – १०१
 • गडचिरोली – २०
 • वर्धा – २४
 • नागपूर (ग्रामीण) – १२
 • चंद्रपूर – ९
 • नागपूर – ७३

उष्माघात टाळण्यासाठी

 • दुपारी १२ ते ४ दरम्यान कडक उन्हात जाळणे टाळा
 •  सोबत पाण्याची बाटली सतत ठेवा. लिंबू, काकडी, कलिंगड आदींचे सेवन करत रहा
 • अशक्तपणा जाणवल्यास इन्स्टा एनर्जी किंवा ग्लुकोण्डी पावडर पाण्यात घालून प्या
 • उष्माघातामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, असह्य वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here