Competition : राज्यस्तरीय महाविद्यालयीन पंडितराव वक्तृत्व स्पर्धा ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार

174

राज्यभरातील महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी, पाच दशकांची समृद्ध परंपरा असलेली ठाणे येथील कै. नी.गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा शनिवार, ३० सप्टेंबर आणि रविवार, ०१ ऑक्टोबर या काळात होणार आहे. श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेतर्फे नी.गो. पंडितराव या बहुआयामी शिक्षकाच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे ५५ वे वर्ष आहे.

नियोजित विषय (१० मिनिटे) आणि आयत्या वेळचा विषय (०३ मिनिटे) अशा दोन भागात ही स्पर्धा होते. पदवी गटासाठी नियोजित वक्तृत्वा करता बदलते राजकारण बदलती लोकशाही, कृत्रिम बुद्धिमत्ता – नवी क्षितीजे नवी आव्हाने, स्टार्ट अप- उद्योग जगताची नवी भाषा, जी.ए. कुलकर्णींच्या साहित्याचा रमलखुणा, समान नागरी कायदा – माझ्या नजरेतून हे विषय आहेत. तर, कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी सायबर फसवणूक तुमची-आमची, चांद्रयान : अंतराळातील उत्तुंग झेप, मराठी असे आमुची मायबोली पण…, डोंगर कोसळतोय…, ना.धों. महानोर – एक मनस्वी रानकवी हे विषय आहेत.

(हेही वाचा Bharat : भारत कसा झाला इंडिया? ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या शब्दांचा काय आहे इतिहास?)

दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. प्रथम क्रमांकास ६००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३००० रुपये, तृतीय क्रमांकास २००० रुपये तर उत्तेजनार्थ १००० रुपये अशी पारितोषिके आहेत. प्रत्येक गटात एका महाविद्यालयास पाच विद्यार्थी पाठवता येतील. दोन्ही प्रकारच्या वक्तृत्वात भाग घेणाऱ्या स्पर्धकांचाच पारितोषिकांसाठी विचार केला जाईल. शिवदौलत सभागृह, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे येथे ही स्पर्धा शनिवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होईल. तर पारितोषिक वितरण समांरभ रविवार, ०१ ऑक्टोबर रोजी दु. ४ वाजता होईल. बाहेरगावच्या स्पर्धकांना विनामूल्य निवासव्यवस्था आणि एक वेळचा प्रवास खर्च देण्यात येईल. स्पर्धेविषयी अधिक माहिती व अर्जासाठी श्री समर्थ सेवक मंडळ (९९८७९०६२०६ किंवा ९८२१५७२४२७, [email protected] ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा समितीने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.