बिहारपासून तामिळनाडूतील दक्षिण भागापर्यंत ते छत्तीसगड, तेलंगणा आणि विदर्भापर्यंत पसरलेल्या द्रोणीय स्थिती (पावसासाठी अनुकूल स्थिती) निर्माण झाल्याने राज्यात विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण वगळता पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात उष्णतेचा कहर
विदर्भात मात्र उष्णतेची लाट १७ मेपर्यंत प्रभावी राहणार आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटांनी कहर माजवत चंद्रपूरातील कमाल तापमानाने आता शनिवारपासून ४६ अंशापर्यंत मजल मारली आहे. सलग दुस-या दिवशीही विदर्भातील उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूरात नोंदवले गेले. चंद्रपूरात रविवारचे कमाल तापमान ४६.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सरासरीच्या तुलनेत चंद्रपूरातील कमाल तापमान तीन अंशाने जास्त नोंदवले गेले. राज्यात आज पुणे वगळता मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पूर्वमोसमी पावसाचा अंदाज होता. मात्र सायंकाळच्या नोंदीत केवळ परभणीत १ मिमी पाऊस झाला.
(हेही वाचाः मान्सून सोमवारपर्यंत दक्षिण अंदमानात पोहोचणार)
ग्रीन अलर्ट
पुणे, औरंगाबाद, जालना आणि उत्तर कोकण तसेच उत्तर मध्य महाराष्टात पूर्वमोसमी पावसाची हजेरी राहणार नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ग्रीन अलर्ट जारी केला. या दोन्ही दिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली.
वारे वाहण्याची शक्यता
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरात १९ मे पर्यंत येलो अलर्ट, परभणी, हिंगोलीत १८ मे वगळता तसेच नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये ग्रीन अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. या भागांत हलक्या पूर्वमोसमी पावसासह ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील, असेही वर्तवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community