उन्हाच्या चटक्यांनी राज्य होरपळून निघत असताना आज वावटळ आणि हलक्या पावसानेही राज्याच्या काही भागांत हजेरी लावली. तर काही भागांत उष्म्याच्या दाहाने गेल्या तीन वर्षांतील कमाल तापमानाचा रेकॉर्ड मोडीत काढला. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात दुपारनंतर वावटळीने काही मिनिटांसाठी अधूनमधून हलक्या शिडकाव्यांसह हजेरी लावली मात्र तापमानावर याचा काहीही परिणाम झाला नाही.
( हेही वाचा : तीन महिन्यांत इतकी रजा घेतली तर ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार फिटनेस सर्टिफिकेट! )
विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही कमाल तापमान चाळीशीपुढे स्थिरावल्याने जनजीवनाला सूर्यप्रकोप असह्य होऊ लागला आहे. दुपारी बाराच्या सुमारास सूर्य डोक्यावर येण्याअगोदरही घामाच्या धारा आणि प्रचंड उन्हात दैनंदिन व्यवहार करताना आता असह्य उन्हाच्या वेदना जाणवू लागल्या.
तापमानाचा रेकॉर्ड
मुंबईत काही दिवसांपूर्वीच कमाल तापमानाची रेकॉर्डब्रेक नोंद झालेली असताना गुरुवारी डहाणू, नाशिक, जळगाव, मालेगाव, सोलापूर, औरंगाबाद, परभणी येथील कमाल तापमानाने तीन वर्षांचा एप्रिल महिन्यातील रेकॉर्ड मोडीत काढला. डहाणू येथील ३६.७ अंश सेल्सिअस, नाशकातील ४१ अंश सेल्सिअस, जळगावातील ४५.६ अंश सेल्सिअस, मालेगावातील ४३.४ अंश सेल्सिअस, सोलापूरातील ४३.४ अंश सेल्सिअस, औरंगाबादमधील ४२.२ अंश सेल्सिअस आणि परभणीतील ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले कमाल तापमान राज्यात एप्रिल महिन्यात २०१९ नंतर पहिल्यांदाच नोंदवले गेले.
जागतिक क्रमवारीत पुन्हा विदर्भातील तापमानाची दखल
गुरुवारी चंद्रपूरातील कमाल तापमान देशात सर्वात जास्त होते. चंद्रपूरात ४५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूराचे कमाल तापमान पाचव्या स्थानावर नोंदवले गेले. त्याखालोखाल उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगावाचे कमाल तापमान जागतिक पातळीवर दहाव्या स्थानावर होते. जळगावातील कमाल तापमान ४५.६ अंशापर्यंत पोहोचले. पंधराव्या स्थानावर विदर्भातील अकोला येथील ४५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान स्थिरावले.
Join Our WhatsApp Community