महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC) च्या विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. नवीन अभ्यासक्रमांसंदर्भात हे आंदोलन केले जात आहे. पु्ण्यात हजारो विद्यार्थी MPSC ची तयारी करत आहेत. परंतु शासन आपले धोरण वारंवार बदलत असल्याने, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. मागच्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु केले. परंतु त्यांची दखल घेतली न गेल्यामुळे हे आंदोलन केले जात आहे.
( हेही वाचा: नाशिक-शिर्डी अपघात: राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर )
विद्यार्थ्यांची मागणी काय?
काही दिवसांपूर्वी MPSCने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये बदल केला. MPSC मंडळाने नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला. यामुळे गेल्या काही वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. नवीन अभ्यासक्रमासंदर्भात त्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांचा जुन्या अभ्यासक्रमावर चांगला अभ्यास झाला होता. परंतु अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाईल. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी करत शुक्रवारी विद्यार्थी रस्त्यावर उतरले.