- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या आर (दक्षिण) विभाग कार्यालयाच्यावतीने साई बाबा मित्र मंडळ, वसनजी लालजी रोड, बजाज शाळेजवळ, कांदिवली (Kandivali) पश्चिम येथील १९ अनधिकृत दुकानांवर बुधवारी २९ जानेवारी २०२५ रोजी तोडक कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, उप आयुक्त (परिमंडळ-७) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (आर दक्षिण) मनीष साळवे यांच्या नेतृत्वात इमारत व कारखाने विभागाच्या वतीने कांदिवली (Kandivali) पश्चिम साई बाबा मित्र मंडळ, वसनजी लालजी रोड, बजाज शाळेजवळील १९ अनधिकृत दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अनधिकृत स्टॉल्सना १९९९ मध्ये नोटीस बजावण्यात आल्या होत्या. हे प्रकरण हे जिल्हा सत्र न्यायालयात २२३२/२००१ व उच्च न्यायालयात ५५३/२०१८ या क्रमांकाखाली प्रलंबित होते. हे प्रकरण ऑक्टोबर २०२४ रोजी उच्च न्यायालयात फेटाळले गेले होते. या ठिकाणी एकूण २७ स्टॉल होते, त्यापैकी ८ स्टॉलला पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती मिळाली. त्याची पुढील सुनावणी ३० जानेवारी २०२५ व ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. उर्वरित १९ स्टॉल जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त करत कांदिवली (Kandivali) मधील प्रवाशांना येता जाताना होणारी गैरसोय दूर करण्यात आली.
या कारवाईत पदनिर्देशित अधिकारी अभय जगताप, सहाय्यक अभियंता शिशिर खोकले, कनिष्ठ अभियंता नितीन ठाकूर यांनी राबवली. या कारवाईत दुय्यम अभियंता ब्राह्मणकर, किशोर जाधव आदींनी सहभाग घेतला. या वेळेस कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडोणे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी कायदा व्यवस्था चोख राबवली. या कारवाईमुळे कांदिवली परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community