31 हजार खड्डे बुजवले, तरी मुंबईकरांचे पाय खड्ड्यातच अडकले

महापालिकेच्या नियमित कंत्राटदारांकडून सर्वाधिक खड्डे बुजवले जात असतानाही मुंबईकरांचे पाय खड्ड्यातच जात आहेत.

मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून, या खड्ड्यांमध्ये रस्ता शोधण्याचा प्रयत्न जनतेकडून होत आहे. मागील पाच महिन्यांमध्ये ३१ हजार ३९८ खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामध्ये महापालिकेच्या नियमित कामगारांमार्फत २२ हजार ८९७ खड्डे, तर नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून ८ हजार ५०१ खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नियमित कंत्राटदारांकडून सर्वाधिक खड्डे बुजवले जात असतानाही मुंबईकरांचे पाय खड्ड्यातच जात आहेत.

दरवर्षी 48 कोटींचा खर्च

मुंबईतील खड्डे त्वरित बुजवण्याचे काम हाती घेण्यासाठी महापालिकेच्या वरळी येथील धूम्रजतू संयंत्र(अस्फाल्ट प्लांट) मध्ये निर्माण करण्यात येणारा कोल्ड मिक्स महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना मागणीप्रमाणे पुरवण्यात येतो. तसेच रस्त्यांवर खड्डे होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व खड्डे बुजवण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा मागवून महापालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट दोन वर्षांचे आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजवण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे २४ विभागीय कार्यालयांसाठी प्रति वर्षी ४८ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.

(हेही वाचाः शिवाजी पार्कची रोषणाई मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून की महापालिका निधीतून?)

अस्फाल्ट प्लांटमार्फत वितरण

याशिवाय, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व अर्थात हमी कालावधीत असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादित वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महापालिकेतर्फे कोणताही मोबदला किंवा अधिदान दिले जात नाही. त्यानुसार महापालिकेच्यावतीने ९ एप्रिल २०२१ ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये खड्डे बुजवण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात महापालिकेच्या अस्फाल्ट प्लांटमार्फत २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांना मिळून एकूण २ हजार ६९६ मेट्रिक टन (१ लाख ०७ हजार ८४३ बॅग) वितरित करण्यात आलेल्या आहेत.

इतके खड्डे बुजवले

आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध महापालिकेच्या नियमित कामगारांमार्फत २२ हजार ८९७ खड्डे बुजवण्यात आलेले आहेत. या बुजवलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ ४९ हजार ९१९ चौरस मीटर आहे. तसेच खड्डे बुजवण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत ८ हजार ५०१ खड्डे बुजवण्यात आले आहेत. या बुजवलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ०६ हजार ९८५ चौरस मीटर आहे. प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांवर संबंधित नियुक्त कंत्राटदारांकडून खड्डे भरुन घेण्याची कार्यवाही विनामूल्य करुन घेण्यात आलेली आहे. अशाप्रकारे एकूण ३१ हजार खड्डे बुजवले असून, त्यांचे एकूण क्षेत्रफळ हे १ लाख ५६ हजार ९१० चौरस मीटर एवढे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः गणेशोत्सवात मुंबईत लागू होणार जमावबंदी… मुंबई पोलिसांचे आदेश नक्की वाचा)

सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण

डांबराचे रस्ते(अस्फाल्ट रोड)मधील बिटुमसच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी यापुढे ६ मीटर रुंदीचे रस्ते सुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्ड्यांचे प्रमाण कमी होणार असल्याचा दावा महापालिकेच्या रस्ते विभागाने केला आहे.

खड्डे कामांवरील खर्चाची चौकशी करा

श्री. गणरायांचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेले आहे. परंतु आजही एस.व्ही.रोड, लिंक रोड, द्रुतगती महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून येत आहेत. महापौर आणि महापालिका आयुक्त हे खड्डेमुक्त रस्त्याचा दावा करत आहेत. पण मुंबईला खड्डामुक्त ते करू शकलेले नाहीत. मागील तीन महिन्यांमध्ये खड्डे बुजवण्यासाठी ३५० कोटी खर्च केले आहेत. त्यामुळे यातही मोठा भ्रष्टाचार असून जर खड्डे भरले नाहीत, मग यावरील पैसा कुणाच्या खिशात गेला, याची चौकशी केली जावी.

 

-विनोद मिश्रा, भाजप नगरसेवक व पक्षनेता, महापालिका

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here