पश्चिम महाराष्ट्र अजूनही पाण्याखाली! दूध पुरवठ्यावर परिणाम!

राज्यात संकलित होणाऱ्या एकूण २ कोटी १० हजार लिटर दुधापैकी सुमारे ६० लाख लिटर दूध दररोज मुंबईला पुरवले जाते.

मागील ५ दिवसांपासून कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांना अक्षरशः मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे या ठिकाणचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका मुंबईला पश्चिम महाराष्ट्रातून होणाऱ्या दूध पुरवठ्याला बसला आहे. रविवारपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर मुंबईकरांसाठी दुधाची सोय परराज्यांतून करावी लागणार आहे.

रस्ते वाहतूक बंद झाल्याचा परिणाम 

महापूरामुळे मागील ४ दिवसांपासून या भागात दूध संकलन बंद पडले आहे. त्यामुळे गोकुळ, महानंदा यांच्यासह अन्य दूध उत्पादक संघांकडे पुरेसा दुधाचा साठा राहिला नाही. तसेच कोल्हापुरातील एकूण १९ मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे साहजिकच दुधाचे टँकरही बाहेर जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे.

(हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्रात २०१९च्या आठवणी झाल्या ताज्या! पुणे-बंगळूर महामार्ग बंद!)

मुंबईला ६० लाख लिटर दुधाची गरज

मुंबईला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात आणि कर्नाटक येथून प्रामुख्याने दूध पुरवठा होतो. त्याशिवाय अल्पप्रमाणात मुंबईतील स्थानिक पुरवठादारांकडून घरोघरी दूध पुरवले जाते. नोंदणीकृत डेअरी मार्फत राज्यात दिवसाला १ कोटी ३० हजार लिटर दूध संकलित केले जाते. तर विना नोंदणीकृत क्षेत्राद्वारे ७० ते ८० लाख लिटर दूध संकलित होते. एकूणच या २ कोटी १० हजार लिटर दुधापैकी सुमारे ६० लाख लिटर दूध दररोज मुंबईला पुरवले जाते. कोल्हापूर येथील गोकूळ दूध उत्पादक संघ आणि गुजरातमधील अमूलकडून साधारण २२ लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. शिवाय सांगली-सातारा येथून इतरही काही दूध संघांकडून मुंबईला दूध पुरवठा होतो.

…तर रविवारी मुंबईत दूध पोहचणार नाहीच!

सध्या कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पूरस्थिती गंभीर असून अनेक महामार्ग, रस्ते बंद आहेत. या भागांतील गोठ्यांवरही पूराचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गोकुळच्या दूध संकलनात गुरूवार आणि शुक्रवारी दूध संकलनात घट झाली. परिणामी, शनिवारीपासून मुंबईत दुधाचा तुटवडा जाणवू शकतो, असे गोकूळने जाहीर केले आहे. कर्नाटकला जोडणारेही अनेक मार्ग सध्या बंद झाले आहेत त्यामुळे तेथून येणाऱ्या दीड ते दोन लाख लिटर दूधाची वाहतूक कशी होणार, असा प्रशद्ब्रा निर्माण झाला आहे.

(हेही वाचा : कोल्हापुरात पुन्हा हाहाकार!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here