Sting Ray – Jellyfish : समुद्र किनारपट्टयांवर ‘स्टिंग रे’, ‘जेलीफीश’चा वावर, गणेश भक्तांसाठी धोक्याची सुचना

गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली आहे

137
Sting Ray - Jellyfish : समुद्र किनारपट्टयांवर 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा वावर, गणेश भक्तांसाठी धोक्याची सुचना
Sting Ray - Jellyfish : समुद्र किनारपट्टयांवर 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा वावर, गणेश भक्तांसाठी धोक्याची सुचना

विशेष प्रतिनिधी,मुंबई

गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर बुधवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडत असून आता अनंत चतुर्दशीपर्यंत अशाचप्रकारे समुद्रावर जावून मूर्ती विसर्जन केले जाणार आहे. परंतु यंदा गणेशोत्सवादरम्यान समुद्र किनारपट्टीवर ब्लू बटन जेलीफीश आणि स्टिंग रे (Sting Ray – Jellyfish) प्रजातीच्या माशांचा वावर मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे समुद्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी जाणाऱ्या भक्तांना मत्सदंश होण्याची भीती वर्तवली जात असून या गणेश विसर्जनादरम्यान भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये. तसेच पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा,असे आवाहन महापालिकेने केले आहे.

गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ (Sting Ray – Jellyfish) प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो. यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेला केली होती.

या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ (Sting Ray – Jellyfish) प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश गिरगाव, दादर, जुहू, मालाड मार्वे,आक्सा, गोराई या विभागांच्या महापालिका सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.

(हेही वाचा-Women’s Reservation : …तरी महिला आरक्षण अंमलबजावणीला उशीर होणार)

मुंबई येथील किनारपट्टी ही एक संरक्षित किनारपट्टी असून या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे या कालावधीत ‘ब्ल्यू बटन जेली’सारख्या जलचरांचे संगोपन व संवर्धन होते. याबरोबर सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये ‘स्टींग रे’ (पाकट) याचेही संवर्धन व संगोपन होत असते. त्यामुळे मुंबईकर नागरिक व पर्यटक यांनी समुद्रकिनारी जाताना महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.

कशी घ्यावी भक्तांनी काळजी

गणेश विसर्जन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात आलेल्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे.

गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये.

पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

नागरिकांच्या जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चौपाट्यांवर  लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचना तसेच उद्घोषकांद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे.

लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घ्यावी.

*मत्स्यदंश आणि प्रथमोपचार*

मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक १०८ रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी केले आहे.

– ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

– ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.

-जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.

–  जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

–  मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.

–  जखम झालेल्या जागी बर्फ लावावा

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.