बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन येत्या ३१ मार्चला!

अवघ्या २० ते २२ मान्यवरांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम उरकून घेतला जाणार आहे.

97

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राहणार की जाणार याबाबतच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. असे असतानाच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी येत्या ३१ मार्च रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्र्रीय स्मारकाच्या मुहूर्ताचा बेत आखला आहे. त्यासाठी जुन्या महापौर निवासस्थानाच्या जागेत मंडप उभारण्यात आला आहे. अवघ्या २० ते २२ मान्यवरांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम उरकून घेतला जाणार आहे. मात्र, दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाढत्या कोविडसंदर्भात निर्बंधाबाबत मार्गदर्शक धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये सावर्जनिक कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घातली आहे. त्यामुळे स्मारकाची मुख्य जबाबदारी ही राज्याच्या मुख्य सचिवांवर असून त्यांच्याकडूनच या नियमांचे उल्लंघन होते की विशेष बाब म्हणून हा कार्यक्रम उरकून घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

पुढील कार्यवाहीची जबाबदारी एमएमआरडीएकडे

दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क समोरील महापौर निवासस्थान आणि परिसरातील ११ हजार ५५१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. महापालिकेची सुधार समिती आणि त्यानंतर महापालिकेच्या मंजुरीनंतर ही महापौर निवासस्थानाची जागा शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाला ३० वर्षांकरता देण्यात आली. २७ फेब्रुवारी २०१७ला महापालिकेच्या मंजुरीनंतर या न्यासाला ही जागा देण्याची सर्वप्रकारची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, जानेवारी २०१९मध्ये प्रत्यक्ष स्मारकाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा आराखडा तयार करुन, पुढील कार्यवाही करण्यासाठी एमएमआरडीएवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२० ते २२ मान्यवर राहणार उपस्थित

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्य सरकारकडून येत्या ३१ मार्च रोजी बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकारच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भूमिपुजनासाठी काही निवडक मान्यवरांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे. यामध्ये २० ते २२ मान्यवरच उपस्थित राहतील, असे समजते. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने कोविडबाबतच्या निर्बंधाकरता मार्गदर्शक धोरण जाहीर केले. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याच्या मुख्य सचिवांच्या विशेष परवानगीने हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे हे स्मारकाचे विद्यमान अध्यक्ष राहतील, अशीही माहिती मिळत आहे.

म्हणून घाईघाईत भूमिपूजन?

आगामी अर्थसंकल्पात या राष्ट्रीय स्मारकासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली. यापूर्वी राज्यात युतीचे सरकार असताना व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या स्मारकासाठी महापौर निवास आणि त्याच्या आसपासच्या परिसराची जागा देण्याचा निर्णय घेऊन, त्याबाबतचे सर्व सोपस्कार करण्यात आले होते. पण आगामी काळात सरकार कोसळल्यास स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात करता आली नाही, याचे शल्य ठाकरे यांना बोचू शकते. त्यामुळेच त्यांनी अत्यंत घाईघाईत भूमिपुजनाचा सोहळा आयोजित केल्याचेही बोलले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.