कर्नाटकातील राजधानी बेंगळुरू ते धारवाड दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे. याआधीही देशातील अनेक भागात ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. ताज्या प्रकरणाची माहिती भारतीय रेल्वेनेच अधिकृतपणे दिली आहे. यात, सकाळी 8.40 वाजता ट्रेन क्रमांक 20661 वर दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कदूर स्थानकाजवळून ट्रेन गेल्यावर ही घटना घडली.
त्यावेळी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडी कर्नाटकातील कदूर-बिरूर सेक्शनच्या मध्यभागी होती. ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या लोकांबद्दल अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, भारतीय रेल्वेने यासंदर्भात चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. या दगडफेकीत ट्रेनच्या सी-4 कोचचे नुकसान झाले आहे. दगडफेकीच्या या घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही.
दगडफेकीची ही घटना कृष्णराजपूर आणि बंगळुरू कॅन्टोन्मेंट दरम्यान घडली आहे. काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून देशभरातील पाच नवीन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला होता. कर्नाटकला मिळणारी ही दुसरी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेन आहे. दगडफेकीची ताजी घटना बुधवारी, 5 जुलै 2023 रोजी घडली.
कर्नाटकात नुकतेच काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असून सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आले आहे, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. याआधी शनिवारी बेंगळुरू-धारवाड दरम्यान धावणाऱ्या याच ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती, ज्यामुळे तिची एक खिडकी फुटली होती. यापूर्वी ही घटना देवांगरे स्थानकाजवळ घडली होती. या गाड्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यावर आरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community