मार्केट परिसरात वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई थांबवा- श्रीरंग बरगे

या कारवाईमुळे मार्केटमध्ये खरेदीसाठी येणारे छोटे व्यापारी, नागरिक त्रस्त आहेत.

मुंबईतील प्रसिध्द भायखळा व दादर मार्केटमध्ये पहाटे खरेदीसाठी जाणा-या व्यापारी व नागरिकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते आहे. मार्केट परिसरात रस्त्यावरील वाहतुकीस अडचण येणार नाही, अशा ठिकाणी वाहने पार्क केली जात असतानाही कारवाई होत असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

त्यामुळे पहाटेच्या वेळी खरेदीसाठी येणारे नागरिक, व्यापा-यांच्या वाहनांवर कारवाई करू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

(हेही वाचाः एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची ‘या’ महिन्याचीही तारीख हुकणार! )

व्यापारी व नागरिक त्रस्त

दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई हा बहुतांशी कामगार वसाहती असलेला भाग आहे. येथील भायखळा व दादर ही गजबजलेली मोठी मार्केट आहेत. छोटे व्यापारी, नागरिकांना भाजी, फळे व फुले या मार्केटमधून खरेदी करावी लागतात. या मार्केट मधील सर्व व्यवहार पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत चालतात. या दरम्यान रस्त्यावरील वर्दळही कमी असते. येथील फूटपाथच्या बाजूच्या जागेत खरेदीसाठी येणारे व्यापारी व नागरिकांकडून वाहतुकीला अडचण येणार नाही, याचा विचार करुन आपली दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करत आहेत. मात्र वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे मार्केटमध्ये खरेदीसाठी येणारे छोटे व्यापारी, नागरिक त्रस्त आहेत.

(हेही वाचाः एसटीत मराठा नोकरभरती बंदीचा धोका)

वाहने उभी कुठे करणार?

या बाजारात स्वस्त दरात भाजी, फुले, फळे मिळत असल्याने छोटे व्यापारी, नागरिक खरेदीसाठी येत असतात. मात्र कारवाई होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतुकीला अडचण येणार नाही अशा ठिकाणी वाहने पार्क केली जात असतानाही कारवाई केली जाते. त्यामुळे वाहने उभी तरी कुठे करणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पहाटेच्या वेळी पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आल्याचे बरगे यांनी सांगितले. यावेळी दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबा बाईत, सरचिटणीस कैलाश जाविर हे सुद्धा हजर होते.

(हेही वाचाः एसटीला बाप्पा पावला! गणेशोत्सवादरम्यान कमावले ‘इतके’ कोटी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here